ताज्या बातम्यामहाराष्ट्र
करवीर तहसील कार्यालयात दाखले प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक ; नागरिकांची गैरसोय

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तहसील कार्यालयात नागरिकांना दाखल्यांसाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. दाखले प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक असल्याने प्रवेश प्रक्रियेसह विविध परीक्षांचे अर्ज भरताना विद्यार्थी, उमेदवारांसह पालकांचा जीव मेटाकुटीला येत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे दाखले सोडण्यासाठी आवश्यक असलेला सरकारी पासवर्ड दोघा खासगी ई-सेवा केंद्र चालकाकडे असल्याची चर्चा आहे.करवीर तहसील कार्यालयात दाखल्यांची संख्या अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. दररोज दाखल होणार्या दाखल्यांच्या तुलनेत निर्गतीचे प्रमाण कमी आहे. यामुळे दाखला वेळेत मिळावा यासाठी अनेकांना वरिष्ठ अधिकार्यांपासून ते अगदी मंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत धाव घ्यावी लागत आहे.