मुरगूडच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे ५४ सदस्य आज होणार हैद्राबाद सहलीला रवाना ; बचतीतून साकारला ५४ जणांचा विमान प्रवास

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
विमानातून प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न असते ते प्रत्यक्षात साकार होतेच असे नाही .मात्र मुरगूडच्या ज्येष्ठ नागरिक संघातील ५४ सदस्यांचे विमान भरारी घेण्याचे स्वप्न रविवारी सत्यात उतरणार आहे. कोल्हापूर ते हैदराबाद या मार्गावर ही सफर ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठांनी जुळवून आणली आहे.
२०१० साली स्थापन झालेल्या मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाने उद्या दहा वर्षात राज्य पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. ज्येष्ठ नागरिकांचे उर्वरित आयुष्य आनंदाचे ,सुखासमाधानाचे जावे यासाठी संघाच्यावतीने खेळ ,मनोरंजनाचे कार्यक्रम, व्याख्याने,शिबीरे,आरोग्य मेळावे आणि सहलींचे आयोजन केले जाते.
संघातील मोजक्याच सदस्यांनी यापूर्वी विमानप्रवास केला आहे. उर्वरीत सभासदांना विमानप्रवास घडवून आणण्याचा मनोदय मासिक बैठकीत जानेवारी २०२० मध्ये संघाचे अध्यक्ष माजी प्राचार्य गजाननराव गंगापुरे, माजी प्राचार्य पी. डी. मगदूम यांनी व्यक्त केला. त्यास मंजुरी मिळाल्यावर पुढील एक वर्ष सर्वांनी बँकेत दरमहा बचत सुरू केली. मार्च २०२१ मध्ये ५४ जणांचे विमान तिकीटाचे बुकिंग ही झाले.एप्रिलच्या तिसऱ्या आठवडयातील तारखाही निश्चित झाल्या. मात्र दुर्दैवाने कोरोनाची दुसरी लाट वेगाने आली. त्यात सहल रद्द करावी लागली त्यामुळे विमानाचाच्या तिकीटाचे सुमारे दोन लाख रुपये सुमारे बुडाले.
मात्र जेष्ठ नागरिकांचा निर्धार कायम असल्याने पुन्हा सहलीसाठी जुळवाजुळव सुरू झाली आणि अखेर 21 नोव्हेंबरला ज्येष्ठ नागरिकांच्या विमान प्रवासाचा योग जुळून आला. आर्थिक संकट असतानाही ज्येष्ठ नागरिकांचा विमान प्रवासाचा निर्धार यशस्वी झाला.
हैदराबादच्या चार दिवसाच्या सहलीत प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनाचा दोन वेळच्या विमानप्रवासासह साडेबारा हजार रुपयाचा खर्च आहे. कोल्हापूर ते हैदराबाद परत हैदराबाद ते कोल्हापूर विमान प्रवासाचा मार्ग असून सहलीत गोवळकोंडा किल्ला, चारमिनार,बिर्लामंदीर, लुम्बीनी पार्क, हुसेन सागर जलाशय, लेजर शो, सालारजंग म्युझियम,रामोजी फिल्मसिटी व अन्य पर्यटन स्थळांचा समावेश आहे. सहलीत ३४ ज्येष्ठ नागरिक व २० महिलांचा समावेश आहे.
सहलीच्या नियोजनासाठी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, उपाध्यक्ष पी.डी.मगदूम, सचिव सखाराम सावर्डेकर ,खजिनदार शिवाजी सातवेकर, पी.डी. माने,अविनाश चौगले व अन्य पदाधिकारी कार्यरत आहेत.