प्रतिकूल परिस्थितीत चिकोत्रा खोऱ्याने शक्ती दिली : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञता ; सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते व बांधकाम कामगारांचा मेळावा उत्साहात

सेनापती कापशी :
सलग पाचवेळा आमदार झालो, त्यात २५ पैकी २० वर्षे मंत्रिपदी राहिलो. या वाटचालीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिकोत्रा खोर्याने मोठी शक्ती दिली, अशी कृतज्ञता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी जनरल बांधकाम संघटनेच्या बांधकाम कामगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ.शिल्पाताई शशिकांत खोत होत्या. सर्व जिद्दी कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमामुळेच लोककल्याणाच्या योजना घरोघरी पोहोचल्या व त्या यशस्वी झाल्या, असे सांगतानाच मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले अशा कार्यकर्त्यांचा मला सार्थ अभिमान आहे.
भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोरगरीब माणसांचा आशीर्वाद आणि पाठबळामुळेच ही संघर्षमय वाट चालत राहिलो. त्या भावनेतूनच यापुढेही सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्यरत राहीन.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, विविध विकासकामांच्या योजना तळागाळापर्यंत पोचवल्या. जनतेच्या व्यक्तिगत आयुष्यातही अनंत अडचणी असतात. व्यक्तिगत समस्या सोडवण्यावरही सातत्याने भर दिला. सेनापती कापशी येथे सुरू असलेले शूरवीर महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक येत्या दीड वर्षाच्या आत पूर्ण होईल. त्यामुळे ऐतिहासिक वारसा असलेले सेनापती कापशी हे गाव महाराष्ट्रासह भारताच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून पुढे येईल.
कोरोनाकाळात शशिकांत खोत व शिल्पाताई खोत या पती-पत्नीनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सेनापती कापशी येथे सुरु केलेल्या कोरोना केअर सेंटरचा हजारो रुग्णांना उपयोग होऊन अनेकांचे जीव वाचले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत म्हणाले, कामगार मंत्री या नात्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबियांना स्थैर्य देणाऱ्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात नंबर वन असेल.
शासकीय कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी वसंत डावरे रा. तमनाकवाडा म्हणाले, संघटनेची एकजूट हीच आपली ताकद आहे. बांधकाम कामगारांसह सर्वच असंघटित कामगारांना न्याय मिळण्यासाठी मंत्री श्री. मुश्रीफ या कर्तबगार नेत्याच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी एकदिलाने उभे राहूया.
“लोकनेता आणि लोकराजा……”
शशिकांत खोत म्हणाले, मंत्री श्री. मुश्रीफ गेली तीस-पस्तीस वर्षे गरिबांपासून-श्रीमंतांपर्यंत आणि पोलीस स्टेशनपासून मंत्रालयापर्यंत सर्वच कामे करीत आहेत. म्हणूनच ते लोकनेता आहेत आणि या काळातील जनतेच्या हृदयातील लोकराजा आहेत. कोणी कितीही बदनामी करु देत आणि कितीही संकटे आणू देत. आपण त्यांना सांभाळणं, ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
“हा लोकशक्तीचा विजय…..”
केंद्राने तीन काळे कृषी कायदे रद्द केल्याचा संदर्भ देत श्री. मुश्रीफ म्हणाले, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिल्यांदा कळलं की लोकांच्या संघटनेची ताकद काय असते ते. परंतु; गेल्या वर्षभरात ७०० शेतकऱ्यांचे जीव गेले त्याचे काय? लखीमपूरला क्रूरपणे शेतकर्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडून मारले त्याचे काय? जरी कायदे रद्द केल्याची घोषणा केली तरी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तसा निर्णय घेतल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध पात्रता परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल विकास विनोद कांबळे व विक्रम विनोद कांबळे या बांधकाम कामगाराच्या मुलांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. तसेच, बुद्धिबळ स्पर्धेतील यशाबद्दल प्रेम गंगाधर निचळ याचाही सत्कार झाला.
व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य दीपक सोनार, शामराव पाटील, अंकुश पाटील, परशुराम शिंदे, जयवंत पाटील, सतीश फेगडे, बाळासो तीप्पे, अर्जुन म्हसवेकर, विलास पाटील, विठ्ठल कांबळे, ॲड.अरुण पाटील, बाबासाहेब सांगले, धनाजी तोरस्कर, साताप्पा कांबळे, अण्णाप्पा लोखंडे, विनोद कांबळे, साताप्पा कांबळे, विनायक सुतार, दिनकर जाधव, प्रवीण नायकवडी, अशोक कांबळे, परशराम गुरव, शिवाजी कसलकर व ग्रामपंचायत पदाधिकारी आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत बाळेघोलचे माजी सरपंच शामराव पाटील यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रवादी जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार धनाजी तोरस्कर यांनी मानले.