निपाणी-मुदाळतिट्टा रस्त्यासाठी बुधवारी मुरगुडमध्ये रास्ता रोको आंदोलन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
निपाणी ते मुदाळतिट्टा रस्ता गेली दोन वर्षे अत्यंत खराब झाला असून, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. यासंदर्भात संतप्त प्रवासी व नागरिकांनी बुधवार, दि. २० ऑक्टोबर रोजी मुरगूड येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. निपाणी-लिंगनूर ते दाजीपूर या राज्य मार्गाच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम खासगी ठेकेदारास दिले आहे. ठेकेदार कंपनीकडून दोन वर्षांपासून रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. या मार्गावरील साईडपट्ट्या उकरून ठेवल्याने धोकादायक बनल्या आहेत. मोऱ्यांची कामे अर्धवट आहेत. अनेक अपघात घडले आहेत. ठेकेदार आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचे काम करत आहेत. प्रवासी व वाहतूकदारांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, याप्रश्नी बुधवार, दि. २० रोजी निपाणी- मुदाळतिट्टा मार्गावर मुरगूड येथे रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन मुरगूड पोलीस ठाण्याला आंदोलनकर्त्यांनी दिले आहे. निवेदनावर प्रदीप वर्णे (मुरगूड), गणपती पाटील (तिट्टा), बळीराम पाटील, भीमराव कांबळे (कुरणी), रंगराव चौगले, वसंतराव कांबळे व कॉ. बबन बारदेस्कर आदींच्या सह्या आहेत. हे निवेदन मुरगूडचे सपोनि विकास बडवे यांना देण्यात आले.