आदमापूर : बाळूमामा मंदिर २० महिन्यांनंतर दर्शनासाठी खुले

मुदाळतिठा प्रतिनिधी :
मार्च 2020 मध्ये होणारी बाळूमामांची वार्षिक भंडारा यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. कोरोनामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील ही पहिलीच मोठी यात्रा होती. त्या वेळेपासून आजपर्यंत हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंदच होते. शासनाच्या आदेशानुसार आज ७ ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेदिवशी राज्यातील सर्व मंदिरे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये बाळूमामा मंदिराचाही समावेश आहे. आज पहिल्याच दिवशी अनेक भाविकांनी बाळूमामांच्या दर्शनाचा लाभ घेतला. दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान दिसत होते. देवस्थान समिती प्रशासनाने दर्शनाची चांगली सोय केली आहे. पश्चिमेच्या बाजूकडून दर्शन मंडपातून रांगेतून दर्शन व पूर्वेकडच्या बाजूने मुखदर्शन अशा दोन्ही दोन्ही प्रकारे होणाऱ्या दर्शनाची सोय केली आहे. यामुळे भाविकांना सुलभ दर्शन उपलब्ध झाले आहे.