शिरोली दुमाला गावचे मर्दानी खेळाचे वस्ताद दत्तू पाटील यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी :
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात मर्दानी खेळ सादर करणारे व गेली आठ दशके मर्दानी क्रिडा क्षेत्रात कार्यरत असणारे करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला गावचे जुण्या पिढीतील मर्दानी खेळाचे वस्ताद दत्तू विठू पाटील ( वय ९२ ) यांचे रविवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले.
दत्तू पाटील यांनी कुस्ती कलेबरोबर मर्दानी खेळाचा छंद जोपासला होता . शेती व्यवसायाबरोबर ते कुस्ती कलेकडे वळले , कुस्ती व्यायाम आणि मर्दानी खेळाचा सराव हा त्यांचा नित्यनियम असत . गेल्या दहा वर्षापासून खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शना खाली रायगडावरील होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मर्दानी खेळाच्या विविध प्रकाराचे सादरीकरण करीत असत. त्यामुळे ते महाराष्ट्रभर प्रसिध्द होते.
नवी दिल्ली येथे झालेल्या शिवजयंती सोहळ्यात खास कोल्हापुरी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके दाखविली होती . तरूणांना लाजवेल असे त्यांचे खेळ असायचे .त्यांनी सारे आयुष्य मर्दानी खेळासाठी वाहून घेतले होते .शेलार मामा म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती .
अंगी कणखरपणा , करारी बाणा आणि चलाखी वृत्ती असल्याने वयाच्या ९० वर्षापर्यत त्यांनी मर्दानी खेळ जोपासला होता . २०१८ साली शिवबा विचार प्रसारक मंडळ नवी मुंबई यांच्यातर्फ विठ्ठल पुरस्कार देण्यात आला . अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती रायगड, कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्ट्र यांच्यातर्फ त्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले त्यांच्या निधनाने शिरोली दुमाला सह पंचकोशीत मर्दानी क्रिडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत होती . त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन नातवंडे असा परिवार आहे . रक्षा विसर्जन बुधवारी सकाळी आहे.