ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह आमदार प्रकाश आबिटकर यांनी मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाची केली पहाणी

कडगांव प्रतिनिधी :
भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प काल रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान अचानक फुटला. यामुळे मेघोली सह तळकरवाडी, वेंगरुळ, नवले पंचक्रोशीमध्ये अचानक आलेल्या प्रकल्पातील पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याबाबत आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह आमदार प्रकाश आबिटकर यांनी पहाणी केली.
प्रकल्पाचे काम सन 2000 साली पुर्ण झाले असून 98 दशलक्ष घनमिटर पाणी साठवून क्षमता होती. दि.21 जुलै ते 1 ऑगस्ट 2021 दरम्यान झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे चिकोत्रा खोऱ्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे मेघोली धरणामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाण्याचा दाब वाढला होता. त्यामुळे पुर्वीपासूनच असणाऱ्या पाण्याच्या गळतीमध्ये वाढ झाली असून यामुळे बांध फुटला असावा असे जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांचे मत आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती तपासणी करण्याच्या सुचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी केल्या.
सदर प्रकल्प फुटल्याने मेघोलीसह पंचक्रोशीतील ओढ्यालगतची शेकडो एकर जमीन प्रचंड पाण्याच्या वेगाने तसेच पाण्यासोबत आलेली माती, दगड-गोटे यामुळे खरबडून गेली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरी, महावितरण कंपनीचे विद्युत पोल, ट्रान्सफार्मर यांचे नुकसान झाले नुकसान झाले असून यासर्वांचा तात्काळ पंचनामाकरून जास्तीत जास्त मदत देण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या. सदर प्रकल्पाची गळती काढण्याबाबत जलसंपदा विभागाला वेळीच सुचना देण्यात आल्या होत्या. सदर गळती दुरूस्ती करण्याकरीता 90 लक्ष रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला होता, असे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
यावेळी बिद्रीचे माजी संचालक के.जी.नांदेकर, कार्यकारी अभियंता स्मिता माने, उपअभियंता भोपळे, सभापती आक्काताई नलवडे, माजी सभापती बाबा नांदेकर, युवानेते संदीप वरंडेकर, तुकाराम देसाई, सरपंच सुनिता राऊळ, उपसरपंच संजय देसाई, सदस्य सयाजी राऊळ, सागर राऊळ, सचिन राऊळ, दशरथ राऊळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.