माजी खासदार राजू शेट्टी यांचे वक्तव्य गैरसमजुतीने; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर; दुसऱ्यांना शिव्या-शाप, चिखलफेक व नाहक आरोप बरे न्हवेत.

कोल्हापूर :
माजी खासदार राजू शेट्टी करीत असलेली वक्तव्ये गैरसमजुतीने आहेत. किंबहुना; त्यांच्यासारख्या एका जबाबदार नेत्याला ती शोभणारी नाहीत, असे प्रत्त्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. जबाबदार नेता म्हणून काम करीत असताना दुसऱ्यांना शिव्या-शाप देणे, चिखलफेक करणे व नाहक आरोप करणे बरे नव्हेत, असेही म्हटले आहे.
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये महापूर आला. त्यामध्ये जे नुकसान झाले त्याबाबत शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचे व तदअनुषंगिक तात्काळ मदत देण्याचे शासन निर्णय निर्गमित केले आहेत. पिकांच्या पंचनाम्याचे आदेशही निघालेले आहेत. एसडीआरएफ निकषानुसार प्राथमिक नुकसान भरपाईचा निर्णय झालेला आहे, अंतिम नुकसान भरपाईचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यानुसार, ७१ हजार, २८९ इतक्या पाणी गेलेल्या घरांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. प्रत्येकी दहा हजाराप्रमाणे रकमा खात्यावर वर्गही होत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये आलेले असून अद्याप किती नुकसान भरपाई द्यावयाची, याबाबत निर्णय झालेला नाही.
दरम्यान, तोपर्यंत माजी खासदार राजू शेट्टी यांनी २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मी व पालकमंत्री सतेज पाटील यांनी अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे मोर्चा काढू नये, अशी विनंती केली होती. निर्णयानंतर तुमचे समाधान झाले नाही तर आंदोलन, मोर्चा इत्यादी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, असेही आम्ही वक्तव्य केले होते.
त्यानंतर एका कार्यक्रमात पत्रकारांनी मला विचारले की, तुमची विनंती माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळली असून ते मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. एवढेच नाही तर पायातील हातात घ्या, असेही वक्तव्य केले आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? त्यावेळी मी, अलिकडच्या त्यांच्या सर्व वक्तव्यावरुन त्यांनी दिशा बदलल्याचे सांगितले. आमच्यामध्ये व स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये चांगले संबंध असताना अचानक अशी वक्तव्ये का ? याचे आश्चर्य आम्हाला होते.
मी ३० ते ३५ वर्षे सामाजिक कार्यकर्ता आहे. लोकांची सेवा करत जनतेच्या आशीर्वादाने लाभार्थी झालो. जिल्ह्यांमध्ये पक्षातील एकालाच मंत्रीपद मिळते. ज्याप्रमाणे माजी खासदार श्री. शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून आमदार, खासदार झाले, तसे बाकीचे झाले नाहीत. आमची प्रतिमा बनवण्यासाठी अनेक वर्षे लागली आहेत. वक्तव्ये करताना कोणाचा अपमान होणार नाही, मने दुखावणार नाहीत, याची दखल नेत्यांनी घ्यावयास हवी. राजकारणामध्ये चढउतार येत असतात. परंतु; दुसऱ्याला शिव्या- शाप देऊन परिस्थिती बदलत नसते. “पायातील हातात घ्या” हे वाक्य फारच चुकीचे होते. आमचे नेते शरद पवारसाहेबांचा उल्लेखही अनाठायी होता.
“जरा काळजी घ्या……”
श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे, संघटनेच्या माध्यमातून तुम्ही स्वतः सोडून इतर कोणीही आमदार-खासदार झालेले नाही, हेही वास्तव आहे. चळवळी, मोर्चा, आंदोलने -धरणे हा तर संघटनेचा आत्मा आहे. परंतु; हे करीत असताना दुसऱ्यांना शिव्या- शाप देणे, दुसऱ्यांवर चिखलफेक करणं आणि नाहक आरोप करणं हेही बरोबर नाही. संघटनेचे नेते म्हणून तुमच्याबद्दल लोकांच्या ज्या भावना आहेत त्या बिघडू नयेत, याचीही काळजी घ्या.
पत्रकात म्हटले आहे, आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार, घरामध्ये पाणी गेलेल्या ७१, २८९ घरांचे पंचनामे पूर्ण झाली आहेत. संबंधितांच्या दहा हजाराप्रमाणे रक्कमा खात्यावर वर्गही होत आहेत. तसेच, ५८,९५७ हेक्टर पिकक्षेत्र बाधित झाले आहे. दुकानदार -१२,४२७, कारागीर- १,१८२, गोठा पडझड- २,४६९, घरांची पूर्णता पडझड-१,०८०, घरांची अंशत: पडझड- ५,५९५ याप्रमाणे झाली आहे. मदत व पुनर्वसन विभागाचा प्रस्ताव, एसडीआरएफच्या निकषांप्रमाणे पिकांची नुकसान भरपाई तसेच पिकांची कापणी व ऊसपिकांची तोड झाल्यानंतर जी तूट येईल त्यावेळी त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी, याबाबत मंत्रिमंडळामध्ये २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे पिकांची नुकसान भरपाई द्यावी, अशीही चर्चा झाली आहे. एसडीआरएफ मदती नंतरचा शासन निर्णय होणे अपेक्षित आहे.