सावर्डे नरबळी प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्याची अंनिस ची मागणी; पिडीत कुटुंबीय आणि घटनास्थळी महाराष्ट्र अंनिस कार्यकर्त्यांची भेट

कागल :
सावर्डे बुद्रुक ता. कागल येथील वरद पाटील याचा खून हा नरबळी असल्याविषयीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी या घटनेचा नरबळीच्या शक्यते संबंधाने अधिक माहिती घेऊन नरबळी अंगाने सत्यशोधनाचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्थांनी सदरची घटना ही नरबळीच असल्याचा दावा केला. तसेच संशयित आरोपी मारुती वैद्य याच्याविषयी नरबळी प्रकाराला बळकटी देणारी काही माहिती ग्रामस्थ आणि वरद च्या कुटुंबियांकडून समजली.
संशयित आरोपी मारुती वैद्य याला लग्नानंतर पंधरा वर्षांनी सुद्धा अपत्य झालेले नाही. यावरून तो अस्वस्थ असायचा. संबंधित संशयित आरोपी हा गेले काही महिने जाणीवपूर्वक गावातील अल्पवयीन मुलांशी विविध बहाण्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब लक्षात आल्यावर अनेकजणांनी त्याला अटकाव असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच मृत वरदच्या आजोबांनी मूल होण्यासाठी वैद्यकीय उपचार घेण्याविषयी सुचवले असता त्याने मी दुसरा एक विधी करणार आहे त्याला यश आले तर मला मूल होईल असे सांगितल्याचे वरदच्या आजोबांनी सांगितले. संबंधित आरोपी मूल होण्यासाठी काही देवऋषी यांच्याकडे सल्ले घेत असल्याचे ही ग्रामस्थांनी सांगितले. या सर्व माहितीचा विचार करता या घटनेचा नरबळी अंगाने अधिक गांभीर्याने विचार करून तपास करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच याविषयी नागरिकांकडे काहीही अधिक माहिती असेल तर त्यांनी ही माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांकडे द्यावी असे आवाहन संघटनेच्या वतीने केले.
यावेळी कुटुंबाच्या भेटीसाठी आलेले पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांचीही कार्यकर्त्यांनी भेट घेऊन तपासात नरबळी बाजूकडे लक्ष देण्याविषयी चर्चा केली असता त्यांनी या अंगाने ही तपास सुरु असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, जिल्हा प्रधान सचिव हर्शल जाधव, मुरगूड शाखा कार्याध्यक्ष भीमराव कांबळे, प्रधान सचिव समीर कटके, विक्रमसिंह पाटील,रेश्मा खाडे, राजवैभव शोभा रामचंद्र, निशांत सुनंदा विश्वास, प्रमोद शिंदे, प्रदीप वर्णे, विकास सावंत, स्मिता कांबळे, बळीराम पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.