रश्मीज्ज स्माईल ट्रस्ट, मुंबई यांचेकडून बशाचामोळा शाळेस सव्वा लाख किमतीच्या भेटवस्तू प्रदान

तांबाळे :
सध्याचे युग खुप ग्लोबल आणि स्मार्ट बनत चालले आहे. शाळा व शिक्षण देखील स्मार्ट बनत चालले आहे. आज अनेक शाळांत डिजीटल स्मार्ट बोर्ड बसवले जात आहेत. पण यासाठी जवळपास एक लाख रुपयांचे इलेक्ट्रॉनिक मटेरियल आवश्यक असल्याने केवळ उच्च भ्रू वस्तीतील मोठ्या खाजगी शाळेत अशा सुविधा पहावयास मिळतात. भुदरगड सारख्या दुर्गम तालुक्यात अद्याप कोणत्याही जिल्हा परिषद शाळेत अशी सुविधा उपलब्ध नाही. पण पाटगांव खोऱ्यातील ‘बशाचामोळा’ या ४ थी पर्यत असणाऱ्या छोट्याश्या शाळेत ही स्मार्ट बोर्ड सुविधा एका समाजसेवी संस्थेच्या योगदानातून प्राप्त झाली. लोकसहभागाचे अनोखे उदाहरण सर्व राज्यासमोर ठेवणाऱ्या या शाळेसाठी ही सुंदर व संस्मरणीय अशी भेट ‘रश्मीज् स्माइल ट्रस्ट, मुंबई’ तर्फे प्रदान करण्यात आली. गेली कित्येक वर्षे अविरतपणे कार्य करणारी ही देशातील नामांकित समाजसेवी संस्था नुकतीच आंतरराष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित झाली आहे. या संस्थेने महागड्या स्मार्ट बोर्ड सोबत संगणक, प्रोजेक्टर, स्पीकर, प्रिंटर, सर्व मुलांच्यासाठी नवीन दप्तरे, पुस्तके व इतर उपयुक्त साहित्य असे एकूण सव्वा लाख किमतीचे साहित्य शाळेच्या मुलांना भेट दिले. यातून तालुक्यातील पहिली स्मार्ट स्कुल होण्याचा बहुमान या जिल्हा परिषद शाळेस प्राप्त झाला आहे. लॉकडाऊन काळात या शाळेने केलेल्या कौतुकास्पद विकास कार्याचा आदर्श राज्यभरातील शिक्षक घेत आहेत. विशेष बाब म्हणजे देशभरातून अनेक शिक्षकांनी या शाळेस स्वेच्छेने दोन लाख हुन अधिक ऑनलाइन मदत पाठवली आहे आणि वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आजच्या या योगदानामुळे शाळा आणखी स्मार्ट बनली आहे. शाळेचे मुख्याद्यापक श्री. सचिन देसाई हे राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा नक्कीच मुलांच्या साठी उपयोग होईल. सदर अमूल्य योगदान शाळेस प्राप्त होण्यासाठी श्री. संभाजी पाटील सर (राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त), डॉ.भावना कुचेरिया मॅडम व रश्मीज् स्माइल टीम चे मोलाचे सहकार्य लाभले. आजच्या या गोजीरवाण्या छोटेखाणी कार्यक्रमास रश्मीज् स्माईल ट्रस्टचे पदाधिकारी डॉ. सुहास कुचेरिया, भावना शहा, धरमशी पटेल, हीना पटेल, दीपा ठक्कर, आदी. सदस्य तसेच शा.व्य.समिती सदस्य व ग्रामस्थही उपस्थित होते. शाळेचे मुख्याद्यापक सचिन देसाई यांनी सदर संस्थेचे आणि उपस्थित लोकांचे कार्यक्रम समयी आभार मानले.