गोरगरिबांच्या आशीर्वादावरच मोठा झालो : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञता; कागलमध्ये निराधारांना अनुदान मंजुरी पत्रांचे वाटप.

कागल :
दीनदलित -वंचितांच्या सेवेच्या पुण्याईवर पाच वेळा आमदार झालो. गोरगरिबांच्या या आशीर्वादावरच मोठा झालो, अशी कृतज्ञता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. माझी आणि सर्वसामान्य – गोरगरीब जनतेची नाळ घट्ट जुळलेली आहे, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या ३०० लाभार्थ्यांना अनुदान मंजुरी पत्रांच्या वितरण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.
प्रास्ताविकपर भाषणात समिती अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ मार्गदर्शनाखाली गोरगरिबांच्या या सेवा कार्याचे काम सबंध महाराष्ट्रात कागल विधानसभा मतदार संघात प्रभावीपणे झाली आहे.
ते तर त्यांचे षड्यंत्र……
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, वृद्धापकाळाने जर्जर झालेल्या म्हाताऱ्या माणसांना, अपंग, मतिमंद रुग्णांना चार घास सुखाचे मिळावेत, या भावनेने आपण ही योजना प्रभावीपणे राबवली होती. परंतु दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी तालुक्यातील दोन हजार लाभार्थ्यांना विरोधकांनी तक्रारी करून व चौकशी लावून अपात्र केले होते. माझ्यापासून गोरगरीब माणूस तोडून, विधानसभा निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठीचे ते तर षड्यंत्र होते, असेही श्री. म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, कागल पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, संजय गांधी निराधार समितीचे सदाशिव तुकान -नानीबाई चिखली, साताप्पा कांबळे -बस्तवडे, राजू आमते – मुरगूड, नारायण पाटील -बेलवडे बुद्रुक, बाळासाहेब दाईंगडे -कसबासांगाव, सौ. सारिका प्रभू भोजे- कसबा सांगाव, दलितमित्र प्रा. एस. आर. बाईत- सुरुपली, पुंडलिक पाटील -बामणी हे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वागत माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांनी केले.