ताज्या बातम्यानिधन वार्ता
मुरगुडमध्ये विजेच्या धक्क्याने ग्रंथपालाचा मृत्यू

मुरगूड प्रतिनिधी :
येथील हुतात्मा तुकाराम वाचनालयाचे ग्रंथपाल अमर अरुण पाटील (वय ३६) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. घटनेची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात झाली असून, सोमवारी रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कार्यालयीन कामकाज आटोपून जांभूळखोरा परिसरातील घरी परतल्यानंतर रात्री १० वा.च्या सुमारास जनावरांना पाणी देण्यासाठी विहिरीवरील विद्युत मोटर सुरू करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.