नानीबाई चिखलीच्या पूरबाधित कुटुंबांचे पुनर्वसन करणार; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही; जाग्यासह घरेही बांधून देण्याची ग्रामस्थांनी केली मागणी.

नानीबाई चिखली :
नानीबाई चिखली ता. कागल येथील अडीचशेहून अधिक पूरबाधित कुटुंबांचे पुनर्वसन करणार असल्याची ग्वाही, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. येथील सर पिराजीराव घाटगे चॅरीटेबल ट्रस्टची जमीन अथवा खडकेवाडा येथील श्री. भैरवनाथ देवालयाजवळ ची सरकार मालकीची जमीन येथे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी श्री. मुश्रीफ यांच्याकडे केली.
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी नानीबाई चिखली येथे पूर पाहणी दौरा करून पूरबाधिताशी संवाद साधला व धान्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आलेल्या प्रापंचिक साहित्याचे वाटपही केले.
यावेळी मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, प्रशासनाने घरांच्या झालेल्या नुकसानीसह शेतीचेही पंचनामे तातडीने करावेत, त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल.
बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले यांनी, शुक्रवार पेठ, चावडी गल्ली, नुल्ले गल्ली, खरबुडे गल्ली, लोहार गल्ली, गुरव गल्ली, गैबी गल्ली, पंचशील नगर या भागातील अडीचशेहून अधिक कुटुंबे पूरबाधित झाल्याचे सांगितले. या समस्येवर कायमस्वरूपी इलाज करण्याची मागणीही त्यांनी श्री. मुश्रीफ यांच्याकडे केली.
यावेळी सरपंच सौ. छाया चव्हाण, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीण सिंह भोसले, उपसरपंच सौ. मनीषा पाटील, कागल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील, सदाशिव दुकान, धीरज मगदूम, श्रीशैल नुल्ले, मयूर आवळेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
“काहीही करुन पुनर्वसन करा……”
“या दौर्यात ग्रामस्थांनी मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. पाऊस जास्त पडला की घरे पाण्याखाली जाणार, प्रापंचिक साहित्यासह पोरं – बाळ व गुराढोरांचेही स्थलांतर होणार आणि आमची परवड होणार. हे नित्याचेच झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर कायमचाच इलाज म्हणून येथील सर पिराजीराव घाटगे चॅरीटेबल ट्रस्टची जागा किंवा खडकेवाडा येथील श्री. भैरवनाथ देवालयाजवळची सरकार जमीन येथे जागा देऊन घरे बांधून द्या, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.