राधानगरी तालुक्यात दमदार पावसाने शेतकरी भात लागणीत व्यस्त

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
पुन्हा एकदा दमदार पावसास सुरुवात झाल्याने भात रोप लागणीत बळीराजा व्यस्त झाला आहे.शेत शिवारे मात्र आता फुलून गेली आहेत.खोळंबलेली कामे आता पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली आहेत. पावसाने साथ दिली तर लवकर शेत कामे आटोपण्यात शेतकरी वर्गाची धडपड राहणार आहे.
मागील जून महिन्यातील चार ते पाच दिवस वगळता पाऊस झाला नाही अक्का जून महिना पावसाविना गेला.उन्हाचा तडाखा पाहता पाऊस पुन्हा लवकर येईल का ही सांशकता बळी राजाला लागून राहिली होती. पाऊस नसल्याने शेतीची कामे रखडली होती.परिणामी मोटार पंपाच्या सहाय्याने निम्या अर्ध्या भात लागणीचे काम साधले गेले.पण त्या भात लागणी जगवण्यासाठी खूप आटापिटा करावा लागला. डोंगरमाथा,माळरानावरील शेती कामे पूर्णपणे थांबली होती.
दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार अखेर दोन दिवसांपूर्वी पावसास सुरवात झाल्याने पुन्हा एकदा शेती कामांनी वेग घेतला असून शेत शिवारे पुन्हा माणसांनी फुलून गेली आहेत.रखडलेली कामे चांगल्या पावसाने लवकर पूर्ण होतील अशी आशा बळीराजाला आहे.