कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे राहुल पाटील यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयवंतराव शिंपी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड.

कोल्हापूर :
महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे राहुल पाटील यांची व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयवंतराव शिंपी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड.
कोल्हापुर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी गेली महिनाभर हालचाली सुरू होत्या. काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमच्याच पक्षाचा अध्यक्ष होणार असा दावा केला होता . मात्र जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे आमदार पी. एन . पाटील यांनी मुलगा राहूल पाटील साठी हालचाली सुरू केल्या. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली. काल रात्रीपासून दोन्ही मंत्री व आमदार पाटील यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. आज सकाळी पुन्हा एकदा चर्चा होऊन अखेर अध्यक्षपद राहुल पाटील यांना देण्यास दोन्ही मंत्र्यांनी संमती दर्शवली. तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष पद देण्यात आले.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आगामी काळात महत्त्वाच्या निवडणुका होणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी विधान परिषदेचे निवडणूक महत्त्वाची आहे. तर हसन मुश्रीफ यांच्यासाठी ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवडणूक महत्त्वाची आहे. या दोन्हीसाठी आमदार पाटील यांची मदत महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय आमदार पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांना सोबत केली होती. आता ते दोन्ही मंत्र्यांच्या सोबत राहणार असल्याने त्यांची महाडिक यांची साथ तुटण्याची सोबत चिन्हे दिसत आहेत. याशिवाय बाजार समिती, शेतकरी संघ, कोल्हापूर महापालिका यासारख्या महत्त्वाच्या निवडणुकांतही ही त्रिमूर्ती एकत्र राहण्याची शक्यता आहे. त्याला शिवसेनेचे सोबत मिळणार असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडीची मुळे आणखी घट्ट रोवली जाणार,असे दिसत आहे.
अतिशय वेगाने झालेल्या राजकीय हालचाली नंतर अखेर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत शिंपी यांची उपाध्यक्षपदी आज (सोमवार) बिनविरोध निवड झाली. ही निवड बिनविरोध करण्यात महाविकास आघाडीला यश आले. भाजपाने निवडणूक लढवण्याची तयारी केली होती; मात्र ऐनवेळी माघार घेतली.