येरे…येरे… पावसा म्हणण्याची बळीराजावर वेळ; पावसा अभावी पिके लागली वाळू : सर्वत्र विदारक चित्र

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले भात तरवे त्याच बरोबर केलेली भात रोप लागण,टोकण पाण्याअभावी वाळू लागली आहे.पाऊस जर झालाच नाही तर मात्र शेतकरी वर्गाची चांगलीच डोके दुःखी वाढणार आहे.”येरे, “येरे, पावसा . . . म्हणण्याची वेळ आता शेतकरी बांधवावर आली आहे.
या पावसाळा हंगामातील जून महिना पावसाअभावी गेला आहे.या महिन्यातील चार पाच दिवस वगळता पाऊस झालाच नाही.शेतकरी वर्गाने मोटार पंपाच्या साहाय्याने कशी – बशी निम्मी -अर्धी रोप लागण केली होती पण आता तीच रोप लागण पाण्याअभावी वाळू लागली आहे.ही रोप लागण जगवण्यासाठी मोटार पंपाचा आधार घ्यावा लागत आहे.पण उन्हाचा तडाखा जोरदार असल्याने पाणी लगेच वाफ्यातून गायब होत आहे.त्यामुळे लावलेल्या रोप लागणीसाठी पाणी देताना ही बळीराजाची दमछाक होत आहे.डोंगर भागाबरोबर सुपीक जमिनीतील तरवे वाळू लागले आहेत. हे तरवे जगवण्यासाठी शेतकरी वर्ग झारीने पाणी देताना दिसत आहे.तर डोंगर भागातील रोप लागण करताना तरवे जिवंत राहतील का?ही चिंता बळीराजाला लागली आहे.
एकंदरीतच पावसामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे.इकडे आड आणि तिकडे विहीर अशी द्विधा अवस्था झाली आहे.उसंत घेतलेल्या पावसाने लवकर सुरवात करावी अशी आस मनाला लागली आहे. आणि “येरे, ‘येरे पावसा म्हणण्याची वेळ आली आहे.पाऊस आलाच नाही तर मात्र अवस्था बिकट होणार आहे.