ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून कागलची ओळख निर्माण करा – सौ. नवोदितादेवी घाटगे ; लेफ्टनंट पदावर निवडीबद्दल माजी विद्यार्थी श्रीधर संकपाळ यांचा गौरवपूर्ण सत्कार

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलचे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकारी म्हणून नाव कमावत आहेत. या शैक्षणिक परंपरेला पुढे नेत, “कागलची ओळख अधिकाऱ्यांचा तालुका अशी व्हावी,” असे प्रतिपादन राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदितादेवी घाटगे यांनी केले.

येथील जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलात माजी विद्यार्थी श्रीधर संकपाळ यांची लेफ्टनंट पदावर झालेल्या निवडीबद्दल आयोजित सत्कार सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

घाटगे पुढे म्हणाल्या,“शाळेचे माजी विद्यार्थी मिळवून देत असलेले यश हे संस्थेचा नावलौकिक वाढविणारे आहे. विद्यार्थ्यांनी शालेय वयातच ध्येय निश्चित करून सातत्य, कठोर परिश्रम आणि शिस्त यांच्या जोरावर पुढे वाटचाल करावी. इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करून तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला, तर विद्यार्थी मोठ्या उंचीवर पोहोचू शकतात,”

सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट श्रीधर संकपाळ यांनी सांगितले की, “व्हन्नूरसारख्या ग्रामीण भागातून येऊन या शिक्षण संकुलात शिक्षण घेतल्याचा मला अभिमान आहे. लहानपणापासूनच ध्येय निश्चित होते. अभ्यासाबरोबर खेळ, स्पर्धा परीक्षा व उपक्रमांत सहभाग घेतल्याने व्यक्तिमत्त्व घडले. भारतीय सैन्यदलात करिअरच्या उत्तम संधी आहेत. विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी अंगीकाराव्यात व योग्य मित्रपरिवार ठेवावा.”

या प्रसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.डी. खोत यांना ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. क्रीडा क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या खेळाडूंचाही सत्कार झाला.शाळेतील विद्यार्थ्यांनी लेफ्टनंट संकपाळ यांच्याशी संवाद साधत प्रेरणादायी प्रश्नोत्तर सत्र घेतले.

कार्यक्रमाला शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी कर्नल एम. व्ही. वेस्विकर, मुख्याध्यापिका सौ. जे. व्ही. चव्हाण, सुधाकर वारूषे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक एस.डी. खोत यांनी प्रास्ताविक केले, सौ. जे.यु. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर सौ. एस.बी. सासमिले यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks