श्री क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा देवालय दर्शनासाठी खुले

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवालयात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दि. २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर बाळूमामा मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद केले होते. बुधवारपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
देवालय व कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रतीवर्षी स्वच्छता मोहीम राबवून देवालय व देवालयाचा परिसर स्वच्छ केला जातो. मंदिराच्या गाभाऱ्यातील सजावट सुवासिक फुलांनी केली जाते. नऊ दिवस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसरा सण काळात भक्तांची दर्शनासाठी रिघ लागलेली असते.
याही वर्षी स्वच्छतेची मोहीम मुंबई येथील आय स्मार्ट फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस वडाळा व बाळूमामा देवस्थानचे कर्मचारी यांनी राबवून मंदिर, मंदिराचा गाभारा व मंदिर परिसराची साफसफाई पूर्ण केली. सोमवारपासून (दि. २२) सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवापर्यंत भाविकांनी देवालय परिसरात श्रीफळ वाढवू नयेत, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.