दरोड्यातील आरोपींना पकडण्यात भुदरगड पोलिसांना यश ; चोरीला गेलेल्या मुद्देमालासह १२ आरोपींना अटक

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भुदरगड तालुक्यातील येथे पुष्पनगर येथे दरोडा टाकलेली सराईत टोळी आणि दरोड्यातील चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करून भुदरगड पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत तब्बल १२ संशयित आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दरोड्यात वापरण्यात येणारे साहित्य व चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पुष्पनगर येथे सोमवारी (दि. १५) पहाटे साडेतीनच्या सुमारास आशिष अरविंद होगाडे यांच्या अंबाबाई ज्वेलर्स या सराफी दुकानामध्ये आणि दुकानाशेजारी असलेले बांगड्याचे दुकान, गाळामालक शामराव रावजी बाबर यांच्या राहत्या घरामध्ये दरोडा टाकून ८७ हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते. पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी भुदरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांना तातडीने तपास करण्याचा आदेश दिला.
दरोडा टाकणारी टोळी ही आदमापूर येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात संशयित आरोपी सिकंदर गोविंद काळे, प्रकाश बन्सी काळे, रमेश विलास शिंदे, आक्काबाई सिकंदर काळे (सर्वजण रा. इटकोर, ता. कळंब, जि. धाराशिव), शंकर पोपट शिंदे, राजन दत्ता शिंदे (दोघेही रा. कोठाळवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव), सोमनाथ ऊर्फ सौम्या सुंदर पवार (रा. वरपगाव, ता. केज, जि. बीड), मंगल रमेश शिंदे, ललिता राजेंद्र पवार (दोघीही रा. वाकडी, ता. कळंब, जि. धाराशिव) या नऊ जणांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला. त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेले एक बोलेरो पिकअप वाहन जप्त केले.
संशयितांना अटक करून त्यांच्याकडे कसून तपास केला असता, त्यांनी दरोड्यातील चोरी केलेला इतर मुद्देमाल त्यांच्या अन्य तीन साथीदारांकडे असल्याचे सांगितले. गुन्ह्यातील अन्य तीन साथीदार चंदाबाई विलास शिंदे (रा. इटकोर, ता. कळंब, जि. धाराशिव), राजेंद्र बप्पा पवार (रा. वाकडी, ता. कळंब, जि. धाराशिव), विलास छन्नू शिंदे (रा. इटकोर, ता. कळंब, जि. धाराशिव) यांना बुधवारी (दि. १७) अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दरोड्यामध्ये चोरीला गेलेला उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कामगिरी बद्दल भुदरगड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.