मुरगूड शहरात चोरीचे सत्र सुरूच ; भरवस्तीत पाच ठिकाणी घरफोडी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता.कागल शहरात चोरीचे सत्र सुरूच असून शहरात पुन्हा एखादा भरवस्तीत चोरीचा प्रयत्न झाला असलेचे काल उघडकीस आले आहे. शहरातील भरवस्तीमधील महालक्ष्मीनगर येथे तीन बंद घरांची कुलूपे तोडून चोरीचा प्रकार होऊन आठ दिवस होण्यापुर्वीच मंगळवारी मुरगूड गाव भाग आणि कापशी रोडवरील एकूण पाच ठिकाणी बंद घरांचे दरवाजे तोडून चोरट्यानी धुमाकूळ घातला. एवढ्या चोऱ्या होऊन देखील घटनेची नोंद करण्यासाठी एकाही ठिकाणचा फिर्यादी पोलीस ठाण्यापर्यंत पोचला नाही. चोरी होऊनही नोंद झालेली नाही.
मगदूम गल्ली येथे दोन घरांमध्ये घरफोडी झाली. चौगुले गल्ली, तुकाराम चौक आणि भोसले कॉलनी येथे देखील चोरीचा प्रयत्न झाला. गाव भागातील चौगले गल्ली येथे अज्ञातांनी दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटारसायकल चोरट्याने ती तिथेच टाकून पळ काढल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यांचे काम सुरू होते. पोलीस ठाण्याच्या पिछाडीस काही अंतरावरील भोसले कॉलनीमध्ये देखील घर फोडून रक्कम व ऐवज लंपास केला आहे. शहरांमध्ये चौथ्यांदा चोरी झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. चोरटे बंद घरे लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.