ताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यक्तिमत्व विकास व समाजसेवेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी व्हा : प्राचार्य डॉ शिवाजी होडगे ; सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय एनएसएस विभागाच्या वतीने विशेष व्याख्यान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) म्हणजे शिक्षणातून समाजसेवा आणि समाजसेवेतून शिक्षण असा दुहेरी लाभ मिळवून देणारी योजना आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा चारित्र्य विकास होतो, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता दृढ होते आणि सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला होतो अशी भूमिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी मांडली.

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानात अध्यक्षीय मनोगता वेळी बोलत होते. “श्रम, सेवा आणि त्याग ही मूल्ये आत्मसात केल्यास विद्यार्थी घडतील,” असे सांगून डॉ. होडगे यांनी विद्यार्थ्यांना एनएसएसमध्ये सहभागी होऊन समाजसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा डॉ अद्वैत जोशी म्हणाले, की विद्यार्थ्यांनी श्रमाची लाज बाळगू नये. कोणतेही काम कनिष्ठ नसते. महात्मा गांधींच्या ‘खेड्याकडे चला’ या विचारातून प्रेरणा घेऊन राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत आहे. स्वयंसेवकांनी मोबाईलपासून दूर राहून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांतून व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा, असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. जोशी यांचा महावीर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी झालेल्या निवडीबद्दल राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राजेश गोधडे यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्स संदर्भात प्रबोधनपर माहिती दिली. “एड्सविषयीचे गैरसमज दूर करून योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवणे ही आजची गरज आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमासाठी प्रा. दीपक साळुंखे, प्रा. रामचंद्र पाटील, प्रा. राजेंद्र पाटील, स्वप्निल मेंडके, प्रा. अवधूत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनीही सहभाग घेतला.स्वागतपर प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. दिगंबर गोरे यांनी केले. आभार प्रा. सुशांत पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. संजय हेरवाडे यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks