नागनाथ गणेश मंडळ सोनाळीचा पारंपरिक गणेश उत्सव उत्साहात

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील सोनाळी येथील नागनाथ गणेश मंडळाचा ४९ वा गणेश उत्सव यंदा देखील पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळाच्या “नो डॉल्बी – नो डान्स” या ब्रीदवाक्यानुसार डॉल्बीपासून अलिप्त राहून सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले.
गणेश आगमनासाठी पारंपरिक बेंजो वादन करण्यात आले. त्यानंतर दररोज रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये होम मिनिस्टर, झिम्मा-फुगडी, रेकॉर्ड डान्स, तसेच मंडळातील महिला, लहान मुले आणि मुलींच्या विविध कलागुणांचे दर्शन घडले. भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीतही उत्सवाची झळाळी कायम ठेवण्यात आली. सकाळी ५ वाजता मंडळातील कलाकारांनी पिंगळा, महिलांचे समई नृत्य, महिलांची लेझीम, लहान मुलींचे नृत्य तरुणांनी सादर केलेला अघोरी देखावा यामुळे वातावरण भारावून गेले.
संपूर्ण गावातून मंडळाच्या या सांस्कृतिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, गावोगावी आदर्श ठरेल असा हा गणेशोत्सव ठरला आहे.