कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण वर्षभरात पूर्ण करणार : मंत्री हसन मुश्रीफ ; पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे दर आठ मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होत आहे. गर्भाशय मुखाचा कॅन्सर व स्तनाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. या आजारांचा नायनाट करण्यासाठी व्यापक मोहिम राबविण्याची गरज आहे. गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कॅन्सर प्रतिबंधासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस- एच. पी. व्ही. लस उपलब्ध झाली आहे. “खुद से जीत…” या अभियानांतर्गत येत्या वर्षभरात जिल्ह्यातील नऊ ते २६ वर्षे वयोगटातील सर्व मुलींना व अविवाहित तरुणींना ही लस मोफत देण्यात येईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर, हेरिटेज कोल्हापूरतर्फे रविवारी दि. २४ महावीर कॉलेजच्या आचार्य हॉलमध्ये सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
ते म्हणाले, “महिला लाजून आजार अंगावर काढतात व वेळेवर उपचार घेत नाहीत. त्यामुळे गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. त्यात कॅन्सर हा एक मोठा धोका आहे. विविध आरोग्य संघटना आणि तज्ज्ञांच्या संशोधनानुसार एच. पी. व्ही. लस घेतल्यास गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता राहत नाही. दर आठ मिनिटांनी जगात एका महिलेला या आजारामुळे जीव गमवावा लागतो. त्यामुळे महिलांना ही लस मोफत देण्याचा संकल्प आम्ही केला आहे.”
याचबरोबर जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मोफत नेत्र तपासणीसह गरजूंना मोफत चष्मे वाटप मोहीम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूरच्या चेअरमन अर्चना चौगुले यांनी केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, बालरोगतज्ज्ञ डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. इब्राहीम अन्सारी, सचिव डॉ. रुपा नागावकर, खजिनदार स्वरूपा कालेकर, प्राजक्ता कलमकर, रीना भोले आदी मान्यवर उपस्थित होते.आभार बी. आर. माळी यांनी मानले.
फिजिओथेरपी केंद्र उभारणार……!
मस्क्युलर डिस्ट्रॉफी रुग्णांसाठी शेंडा पार्क येथे निवासी फिजिओथेरपी केंद्र लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाहीही मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली.