बस्तवडे- आणूर मार्गावरील वेदगंगा नदीच्या महापुराच्या पाण्यात ट्रक पलटी ; गावकरी व मुरगूड पोलिसांनी चालक व क्लिनरचा वाचवला जीव

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वेदगंगा नदीला आलेल्या महापूरातून अतिधाडसाने बॅरिकेटस तोडून बस्तवडे पुल पार करीत जाणारा ट्रक महापुराच्या पाण्यातच पलटी झाला. ट्रक चालक व क्लीनर त्यामध्ये अडकले. त्यातही धाडस करीत बुडालेल्या ट्रकवर चढून बचावासाठी आरडाओरडा केला. पहाटे फिरायला येणाऱ्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने मुरगूड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बस्तवडे येथील गावकरी व मुरगूड पोलिसांनी पाण्यात खोलवर जात चालक व क्लिनरचा जीव वाचवला. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली.
माहिती अशी की, पहाटे तीनच्या दरम्यान सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुरगूड पोलिसांच्या सूचनेनुसार बस्तवडे पुलाच्या दक्षिणेला बस्तवडे कडील बाजूस लावलेले बॅरिकेट काढून पोल्ट्री खाद्य घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू टुकने पूल पार केला. या ठिकाणी पुलावर किंवा बस्तवडे कडील बाजूस जोड रस्त्यावर पाणी येतच नाही. मात्र उत्तरेला आणूरकडील जोड रस्त्यावर पाणी येते. या पाण्यातून पुढे जाताना रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक बाजूच्या चरित गेला व पलटी झाला. यातील ड्रायव्हर व क्लिनर लगेच त्या उलटलेल्या ट्रकवर चढून बसले. कारण ट्रकचा काही भाग उघडा होता. तिथे उभे राहून त्यांनी बचावासाठी ओरडणे सुरू केले.
नागरिक सकाळी फिरायला आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. पोलीस पाटील धनाजी वायदंडे यांनी मुरगूड पोलिसांना ही माहिती देताच दक्षिण बाजूला मुरगूड पोलीस तर उत्तर काठावर कागल पोलीस दाखल झाले. यानंतर बस्तवडे कडील बाजूने पाच ते सहा फूट यानंतर बस्तवडे कडील बाजूने पाच ते सहा फूट पाण्यातून बस्तवडे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण यादव, प्रकाश सुतार, हवालदार रवी जाधव, पोलीस पाटील धनाजी वायदंडे यांनी घटनास्थळी जाऊन ट्रकवर अडकलेल्या दोघांना सोडवून पाण्याबाहेर काढले. यावेळी पोलीस हवालदार सतीश वर्णे , भैरवनाथ पाटील , कॉन्स्टेबल रुपेश पाटील यांनी या सर्व बचाव मोहिमेत भाग घेतला. व त्या ट्रकच्या चालक व क्लिनरला सुखरूप बाहेर काढले.