डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधावा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निवेदन

गडहिंग्लज प्रतिनिधी: राजेंद्र यादव
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निघृण खुनाला २० ऑगस्ट रोजी १२ वर्षे पूर्ण होत आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सीबीआय करत होती. सीबीआयने तपास करून त्याविषयी खटला पुणे विशेष न्यायालयात दाखल केला होता. त्यामध्ये पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अन्दुरे या दोघांना दोषी ठरवून शिक्षा दिलेली आहे. असे असले तरीही या खुनामागचे सुत्रधार अजूनही मोकाटच आहेत. त्यांना पकडण्याचे कुठलेही प्रयत्न शासनाच्या पातळीवर सुरु नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करुन या सूत्रधारांना कधी पकडणार असा संतप्त सवाल या निवेदनाद्वारे सरकारला विचारत आहे.
‘डॉ नरेंद्र दाभोलकरांचा खून हा त्यांचे विचार संपविण्यासाठी केलेला एक सुनियोजित कट होता’ असे निरीक्षण पुणे येथील सत्रन्यायालयाने नोंदविले असतानादेखील त्यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी शासन काहीही प्रयत्न करत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. या सूत्रधारांना त्वरित पकडावे.
कॉ. गोविंद पानसरे, प्रा.एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खूनखटले देखील अजून सुरु असल्याने या चारही खूनांमागील सुत्रधारावर कारवाई होऊ शकलेली नाही. जोपर्यंत हे सूत्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्यांना असलेला धोका कायम आहे, असे आम्हाला वाटते.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खून खटल्यामध्ये वीरेंद्रसिंह तायडे, संजीय पुनाळेकर व विक्रम भावे यांची जी सुटका झाली आहे, त्याविषयी सी.बी.आय. ने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली नाही, ही अक्षम्य दिरंगाई आहे. सी.बी.आय. ने तातडीने उथ न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी अशी मागणी देखील आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत.
सर्व अडचणींना तोंड देत गेली बारा वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम निर्धाराने चालू आहे.संघटनेच्या पुढाकाराने महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा असे दोन सामाजिकदृष्ट्या महत्वाचे कायदे पारित करण्यात आले आहेत. त्यामधील जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत १५०० पेक्षा जास्त भोंदू बाबा-बुवांवर कारवाई करण्यात आलेली आहे. अशाच स्वरूपाचा जादूटोणा विरोधी कायदा कर्नाटक व गुजरात या राज्यांमध्येदेखील करण्यात आला आहे.
देशभरातल्या वाढत्या बुवाबाजीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायदा देशभरात लागू करावा अशी मागणी गडहिंग्लज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याद्वारे करण्यात आले आहे.
याचे निवेदन दिलीप जाधव (अव्वल कारकून) यांच्याकडे देण्यात आले. यावेळी प्रा.प्रकाश भोईटे (राज्य कार्यकारणी सदस्य),सुभाष कोरे (माजी कार्याध्यक्ष), अशोक मोहिते (सचिव),प्रकाश कांबळे (शहराध्यक्ष),प्रा. अशपाक मकानदार, डॉ.शशिकांत संघराज,रमेश वांद्रे, प्रज्ञा प्रकाश भोईटे, सिताराम कांबळे,पुंडलिक रक्ताडे उपस्थित होते.