केडीसीसी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाचा दुसरा हप्ता वर्ग ; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यात उत्साह आणि आनंद

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या वेतनवाढ फरकापोटीचा दुसरा हप्ता कर्मचाऱ्यांच्या पगार खात्यांवर वर्ग केला आहे. बँकेने वाढीव पगाराच्या फरकापोटीची १२ कोटी, ७७ लाख रुपयांची ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केली आहे. यामुळे गणेश चतुर्थीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्याचा निर्णय दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी घेतला होता. मंत्री व बँकेचे अध्यक्ष श्री. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत बँक व्यवस्थापन आणि बँकेत कार्यरत असलेल्या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, बँक एम्प्लॉईज युनियन या दोन्ही युनियनमध्ये हा करार झाला होता. एक एप्रिल २०१७ पासून ही पगारवाढ लागू झाली. पगारवाढीसह वेतनवाढीच्या या फरकापोटी मागील ८८ महिन्यांचा एकूण ३७ कोटी फरकही बँकेच्या नफ्यातील तरतुदींमधून कर्मचाऱ्यांना देण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला होता.
या करारानुसार बँकेने वेतनवाढ फरकापोटीच्या पहिल्या हप्त्याची रु. १५ कोटी, १३ लाख एवढी रक्कम दि. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केली होती. वेतनवाढ फरकापोटीची उर्वरित रक्कम तिसऱ्या आणि शेवटच्या हप्त्यात म्हणजेच ऑगस्ट २०२६ मध्ये दिली जाणार आहे.
बँकेचे अध्यक्ष व मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गणेश चतुर्थीच्या सनापूर्वी वेतनवाढ फरकापोटीच्या दुस-या हप्त्याची ही रक्कम कर्मचाऱ्यांना देऊ शकलो, याचे आम्हा सर्व संचालक मंडळाला समाधान आणि आनंद आहे. बँकेने अतिशय चांगली प्रगती केली आहे. बँक ज्या परिस्थितीतून गेली त्यावर मात करण्याची शक्ती शेतकऱ्यांनी दिली. कर्मचाऱ्यांनी बँकेच्या म्हणजेच पर्यायाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटावे. विशेषता; ठेव व व्यवसाय वाढीसाठी झोकून देऊन काम करा.