आंनदराव आबिटकर महाविद्यालय येथे रक्षाबंधन स्नेह, संस्कृती सण उत्साहात साजरा

निकाल न्यूज प्रतिनिधी :
श्री. आनंदराव आबिटकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात रक्षाबंधन सण पारंपरिक उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भुदरगड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक डी.ए.डवरी तसेच त्यांचे सहकारी एस.एस.पाटील , आर.आर.चौगले, एस.टी.पाटील, एस.एच.परीट उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक प्राध्यापिका एस. डिसोझा यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पोलिस नाईक डी.ए. डवरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण साजरा केला.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस नाईक यांनी सांगितले की, “रक्षाबंधन हा फक्त उत्सव नसून तो आयुष्यभर टिकणाऱ्या नात्याचा पवित्र धागा आहे. बहिण भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते, तर भाऊ तिचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करतो.” त्यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि आत्मविश्वासाने जगण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जी. डी. शेणवी होते. त्यांनी आपल्या भाषणात भारतीय सणांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका एम. सुतार यांनी केले तर आभार सहाय्यक प्राध्यापिका खोपडे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, स्नेह आणि सांस्कृतिक जाणीव यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.