आषाढ महिन्यातील जत्रेसाठी थेट व्यावसायिकाकडून पैसे उकळले ; इस्पुर्ली पोलिस ठाण्यातील प्रकार

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आषाढ महिन्यातील जत्रेसाठी थेट व्यावसायिकाकडून पैसे उकळण्याचा प्रकार इस्पुर्ली पोलिस ठाण्यातील पोलिसांकडून घडल्याने त्याची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी ठाण्यातील पोलिसांची आज झाडाझडती घेतली. यानंतर ठाण्यातील तीन पोलिसांवर निलंबन अथवा बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका निवृत्त पोलिसाने ऑनलाईन पैसे दिल्याचा स्क्रीन शॉट पोलिस अधीक्षकांना पाठवून तक्रार केली होती.
सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचे इस्युर्ली परिसरात फार्म हाऊस आहे. आषाढ महिन्यातील जत्रेसाठी त्यांच्याकडून ऑनलाईन पाच हजार रुपये घेण्यात आले. याची तक्रार त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली. त्यानंतर करवीरचे उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. यात प्रभारी अधिकाऱ्यांसह तीन पोलिसांची चौकशी करण्यात आली. तसेच त्यांना पोलिस अधीक्षकांसमोर उभे करण्यात आले. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच ऑनलाईन पैसे स्वीकारल्याबद्दल कानउघाडणी करण्यात आली.
दरम्यान, त्यांच्याविरोधात त्र्यंबोली यात्रा व एसी बसविण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून तक्रारी आल्या होत्या, तसेच जुगार अड्यावर छापा टाकून ताब्यात घेतलेल्या रकमेपेक्षा ती रेकॉर्डवर कमी दाखविल्याची तक्रारही करण्यात आली होती. याबाबत पोलिस उपअधीक्षक क्षीरसागर म्हणाले, ‘गेल्या एक-दोन महिन्यात त्यांच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या. त्याची सखोल चौकशी केली केल्यानंतर त्यांना पोलिस अधीक्षकासमोर उभे करण्यात आले. तिघांवर निलंबन अथवा बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे.