ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल तालुक्यातील कुरुकली येथे भरदिवसा घरफोडी ; ७ लाखांचे दागिने लंपास ; परिसरात भीतीचे वातावरण 

 मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे 

कागल तालुक्यातील कुरुकली येथे गावाच्या भरवस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या मागील बाजूने घरात शिरून तिजोरीतील साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व २२ भार चांदीचे दागिने असा सुमारे ७ लाखांचे दागिने घेवून चोरट्यांनी पोबारा केला. घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले होते. या धाडसी चोरीने गावात खळबळ माजली आहे.

पांडुरंग धोंडीराम पाटील यांच्या घरातील लोक दुपारी बाराच्या दरम्यान घराला कुलूप लावून शेताकडे गेली होती. शेतातील काम आटोपून दुपारी ३ वाजता घरी आल्यावर तिजोरी उघडून पाहिले असता त्यातील अडीच तोळ्याचे गंठण, अडीच तोळ्याचा राणी हार, साडेतीन ग्रॅमचे टॉप्स, एक ग्रॅमचे टॉप्स असा सुमारे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने तसेच चांदीचा ८ भाराचा छल्ला व १४ भाराचे पैंजण असा सुमारे २२ भाराचे चांदीचे दागिने असा सुमारे ७ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

घटनास्थळाची पोलिसांनी माहिती घेवून पंचनामा केला. चोरट्यांनी तिजोरीवर भला मोठा दगड मारून तिजोरीची काच फोडली आहे. चोरटे मागील दारातून आत आले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे.

तसेच श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. हे श्वान घरातच बराच वेळ घुटमळत घराच्या मागील बाजू पर्यंत गेले होते. तसेच पोलिसांनी ठसे तज्ञांना पाचारण करून ठसे घेतले आहेत. एलसीबीच्या पथकानेही घटनास्थळी येवून माहिती घेतली आहे. मुरगूड पोलीस ठाण्याच्या पीएसआय प्रियांका वाकळे या पथकासह अधिक तपास करीत आहेत. या चोरीने गावात भीतीचे वातावरण आहे. 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks