कागल तालुक्यातील हमिदवाडा येथे भिंत कोसळून सेवानिवृत्त शिक्षिकेचा मृत्यू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड – निपाणी मार्गावरील हमीदवाडा येथे नव्याने बांधत असलेल्या घराची भिंत कोसळून सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिकेचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली. सुलोचना मधुकर कुंभार (मूळ गाव सुरुपली ता. कागल) असे मृत महिलेचे नाव आहे. पूजा भरत कांबळे असे जखमी महिलेचे नाव आहे. सुलोचना यांचे पती मधुकर कुंभार यांनी मुरगूड पोलिसात वर्दी दिली आहे.
सुरुपली येथील मधुकर गणपती कुंभार हे अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबासह मुरगूड – निपाणी मार्गावरील हमिदवाडा येथे राहतात. कुंभार यांच्या घराच्या शेजारीच प्रसाद कृष्णात पाटील यांच्या घराचे चिऱ्याचे दगडाचे बांधकाम सुरु आहे. या घराची चिऱ्याच्या दगडाने सुमारे पाच फुट बांधकाम झाले आहे.
गुरूवारी दुपारी दोन च्या सुमारास सुलोचना कुंभार या आपल्या घराच्या कुलपाची चावी भाडेकरू पाटील यांच्या घरी आणायला गेल्या होत्या. त्यांच्या घराशेजारी बांधलेल्या दगडी चिऱ्याची भित अचानक सुलोचना कुंभार व पूजा कांबळे यांच्या अंगावर कोसळली. तातडीने दोघींना निपाणी ‘येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये हलवले. तेथे डॉक्टरांनी सुलोचना कुंभार मयत झाल्याचे घोषित केले.
सुलोचना कुंभार या प्राथमिक शिक्षिका होत्या. काही वर्षापूर्वी त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पश्यात पती व दोन मुली आहेत. पूजा भरत कांबळे यांच्यावर निपाणी येथे उपचार सुरु आहेत. अधिक तपास हे. कॉ पाटील करीत आहेत.