वाघापूर नागपंचमी यात्रा उत्साहात संपन्न ; हजारो भाविकांनी घेतले ज्योतिर्लिंगाचे दर्शन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वाघापूर (ता. भुदरगड) येथील ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पावसाची उघडीप राहिल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे भाविकांत समाधानाचे वातावरण दिसत होते.
पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पहाटे पाच वाजता आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा संपन्न झाली. महाआरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
यावेळी कुभांर समाजातील नाग मूर्ती देवालयात अर्पण करण्यात आली. ‘जोतिर्लिंगच्या नावाने चांगभलं’ चा जयघोष करीत दिवसभर हजारो भक्तांनी दर्शन घेतले. महिलांनी लाह्या वाहत नाग देवतेची गाणी गायली. यात्रेमुळे वाहतूक कोंडी होवू नये यासाठी वाघापूर, आदमापूर, मुदाळतिट्टा, कुर अशी एकेरी वाहतूक सूरु होती. तसेच भाविकांसाठी गारगोटीसह अनेक आगारातून ज्यादा बस सोडण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग प्रशासन, देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या नियोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडली.