ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणांनी शिक्षण सोडून कोणत्याही वाममार्गाला जाऊ नये : सपोनि शिवाजी करे

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

“तरुणांच्या आयुष्यामध्ये नशा नको तर दिशा हवी” असे प्रतिपादन मुरगूड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. शिवाजी करे यांनी केले. ते सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड मध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीमार्फत आयोजित केलेल्या अमली पदार्थ विरोधात झिरो मिशन अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये बोलत होते. त्यांनी आपल्या विवेचना मधून तरुणाई समोरच्या अनेक समस्या उलगडून दाखवल्या. ते म्हणाले की युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या जीवनातील ध्येय साध्य करावे .

आजची तरुणाई इंस्टाग्राम, फेसबुक अशा अनेक सोशल साइट्स मध्ये गुंतलेली आहे. पण हे करत असताना त्यांनी त्याचा अतिरेक करू नये. बरीचशी तरुणाई आज सायबर फ्रॉड मध्ये अडकण्याचा धोका निर्माण झालेला आहे. या प्रसंगी मा. श्री. शिवाजी करे यांनी तरुणांना सायबर फ्रॉड, डिजिटल अरेस्ट यासारख्या संकल्पना समजावून सांगून त्यापासून सावध राहण्याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी टोल फ्री नंबर्स व पोलिसांच्या सहकार्याने कशा पद्धतीने आपण समाजामध्ये सुरक्षित राहू शकतो याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बोलत असताना मा.श्री. करे म्हणाले की आजचा युवक हा चरस, गांजा अशा अनेक अमली पदार्थांच्या विळख्यामध्ये अडकतो की काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे. एखादी व्यक्ती जेव्हा व्यसनाधीन बनते त्यावेळेला फक्त त्याचेच आयुष्य उध्वस्त होत नाही तर त्याचे कुटुंब व पर्यायाने तो देश खिळखिळा बनतो व ती व्यसनाधीन व्यक्ती गुन्हेगारीला प्रवृत्त होते. हे फक्त त्याच्यासाठीच नाही तर कुटुंबासाठी व पर्यायाने आपल्या देशासाठी घातक आहे. पुढे ते म्हणाले की अमली पदार्थ सेवन करणे, बाळगणे व विक्री करणे हे फार मोठे गुन्हे आहेत व याबद्दल मोठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे.
त्याचसोबत करे यांनी युवकांनी मोटर वाहन नियमांचे कडे कोट पालन करावे असे प्रतिपादन केले ज्यामध्ये वाहनाची वेग मर्यादा, वाहन परवाना, वाहन विमा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्याचसोबत त्यांनी
आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी डॉल्बी सारख्या प्रलोभनांना बळी न पडता जे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे त्याच्या ऐवजी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अंतर्गत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ.सौ. माणिक पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचा उद्देश व्यक्त केला.
अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सांगितले की आयुष्य हे अनमोल आहे. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर सावधानतेने पाऊल टाका आणि कष्ट करत रहा. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपले ध्येय साध्य करा. कार्यक्रमांमध्ये आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.शिवाजी पोवार यांनी केले.

याप्रसंगी प्रशांत गोजारी सहाय्यक फौजदार, मुरगुड पोलीस स्टेशन तसेच अरविंद सोलापुरे पोलीस हवालदार उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन प्राध्यापक सुशांत पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks