ताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हीएसआयच्या ज्ञानलक्ष्मी ऊस प्रशिक्षणासाठी ‘शाहू’ च्या ४१महिला रवाना ; आज अखेर ५९९महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचा लाभ

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तथा व्हीएसआय पुणे या महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या शिखर संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या महिलांसाठीच्या ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४१महिला रवाना झाल्या.

ऊसाची व साखरेची उत्पादकता वाढवण्यासाठी ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे व त्याचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे व्हीएसआय मार्फत गत चौतीस वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे. ऊस शेतीत महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गेल्या अठरा वर्षापासून महिलांसाठी स्वतंत्र ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.शाहू साखर कारखान्याच्या ५९९ महिलांनी आज अखेर या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे.त्याचा ऊस शेतीमध्ये उपयोग करून उत्पादनात वाढ होण्यासाठी फायदा झाला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात व्हीएसआयचे शास्त्रज्ञ शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन करतात.

शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखान्यामार्फत महिला व पुरुष सभासद शेतकरी या प्रशिक्षणासाठी पाठवण्याची परंपरा सुरू केली . त्यांच्या पश्चात कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी ही परंपरा कायम चालू ठेवली आहे. कारखाना प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या महिला प्रशिक्षणासाठी रवाना झाल्या.

यावेळी संचालिका सौ.सुजाता तोरस्कर,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, शेती अधिकारी दिलीप जाधव, ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील आदी उपस्थित होते.

महिला शेतकऱ्यांना ‘शाहू’चे असेही प्रोत्साहन…..

संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांसह इतर राज्यातील कारखान्यांच्या निवडक दोनशे महिला या प्रशिक्षणामध्ये सहभागी होतात.त्यापैकी शाहू साखर कारखान्याच्या ४१महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या महिला सभासदांसह आजअखेर प्रशिक्षण घेतलेल्या महिलांकडून व्हीएसआयकडून आकारण्यात येणारी प्रशिक्षण फी न घेता कारखान्यामार्फत भरली जाते. शाहू साखर कारखान्याने महिलांच्या ऊस शेतीतील योगदानास अशा वेगळ्या पद्धतीने प्रोत्साहन दिले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks