निसर्ग प्रेमींकडून वडाच्या झाडाचे पुनररोपण ; मडीलगे खिंडीतील यशस्वी उपक्रम

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
विजेचा खांब, तारा, गटर व एका बाजूचा भराव खचल्याने निस्तेज झालेल्या साधारण 15 फूट उंच व 8 वर्ष वयाच्या वडाच्या झाडाचे पुनररोपण भुदरगड तालुक्यातील मडीलगे खिंडीतील भैरवाच्या मंदिराजवळ करण्यात आले शिवाय परिसरात गारगोटी कोल्हापूर रस्त्याच्या दुतर्फा 20 आम्रवृक्षांचे रोपणही करण्यात आले.
दरवर्षी आपण पावसाळ्याच्या दिवसात नवीन झाडांचे रोपण करत असतोच पण पावसामुळे उन्मळून पडलेली, भराव खचल्याने अस्वस्थ असणारी जुनी झाडेही वाचवणे तितकेच महत्वाचे असते. हा हेतू घेऊन भुदरगड तालुक्यात अशाच 15 फूट उंच व 8 वर्ष वयाच्या झाडाचे दोन किलोमीटर प्रवास करत जेसिबी मशीनच्या सहाय्याने मडीलगे खिंडीतील भैरवाच्या मंदिरासमोर पुनररोपण करण्यात आले. झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी झाडाच्या मुळाशी बुरशीनाशकांचा वापरही करण्यात आला. सदर उपक्रमास निसर्गप्रेमी व स्थानिक नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी वृक्षमित्र सुखदेव मगदूम , संजय भोसले, डॉ.अर्जुन कुंभार , मा. डी व्ही कुंभार , नंदकुमार मोरे , वनपाल काशिद साहेब, केमिस्ट असो जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव ढेंगे, ग्राहक मंच जिल्हा अध्यक्ष प्रशांत पुजारी, मानसिंग नाईक (खानापूर) लोकमत पत्रकार शिवाजी सावंत , विनायक पाटील (नाधवडे), पक्षी अभ्यासक पर्यावरणमित्र अमोल शिरोडकर, एस के पाटील (आकुर्डे), दादासाहेब कुंभार, अजित यादव (दारवड), रोहित पोवार, धीरज भोसले, वाईल्ड फोटोग्राफर विजय पाटील , रमेश पाटील यांचेसह असंख्य वृक्षमित्र उपस्थित होते.
मडीलगे खिंड व भैरवनाथाचा परिसर कचऱ्याच्या विळख्यात आहे. प्लास्टिक बरोबरच खराब झालेले अन्न, घरातील निरुपयोगी वस्तू, औषधे -गोळ्या, बॉटल्स, मद्याच्या बॉटल्स, मेलेली जनावरे इथे टाकली जातात त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी जाणवते. भटक्या कुत्रांचा उपद्रवही आहे. नवीन झाडांच्या रोपणामुळे पर्यावरणप्रेमींचा वावर वाढून काही अंशी बदल नक्कीच घडेल अशी आशा आहे.
अवधुत पाटील
पर्यावरणमित्र