चिमगाव मध्ये एका तरुणावर चाकू हल्ला ; दोघांना अटक

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील चिमगाव येथे मोटारसायकल मोठा आवाज करत कशाला फिरवता अशी तक्रार केल्याचा राग मनात धरून संजय यशवंत करडे व त्यांचा मुलगा स्वप्निल संजय करडे यांनी गावातील एका तरुणावर चाकूने हल्ला केला. यामध्ये अजिंक्य भरत एकल (वय ३३) गंभीर जखमी झाला असून जखमीवर मुरगूड ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून सीपी आर येथे पाठवण्यात आले आहे.याबाबत मुरगूड पोलिसांनी करडे बाप लेक दोघांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दोन-तीन दिवसांपूर्वी स्वप्निल संजय करडे हा अन्य दोघा मित्राबरोबर गावातून मोटारसायकलवरून फेऱ्या मारत होता. यावेळी मुद्दाम त्या गाडीचा आवाज वाढवला जायचा. याबाबत अजिंक्य एकल यांनी माजी उपसरपंच अमोल प्रकाश एकल यांच्याकडे तक्रार केली. याबाबतचा राग मनात धरून संजय करडे यांनी अजिंक्य एकल यांना फोन करून बोलावले. अजिंक्य एकल यांच्यावर चाकूने वार केले.याबाबतची फिर्याद रणजित एकल यांनी मुरगूड पोलिसात दिली आहे. अधिक तपास मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करत आहेत.