शेणगांवचे जिगरबाज युवक योगेश कोळी याने वेदगंगा नदीमध्ये अडिच तासाच्या शॊध मोहिमेत महापुरात अडकलेले प्रेत शोधून काढले बाहेर
पाण्याचा धडकी भरवणारा विशाल प्रवाह, जोराचा पाऊस आणि वारा अशा प्रतिकूल परिस्थीतीत जीवावर उदार होवून महापुरात झोकून देणे हे येरागबाळ्याचे काम नाही.

कडगांव (ता.भुदरगड) –
शब्दांकन – ज्येष्ठ पत्रकार सुभाष माने
येथील सुधा भगवान परिट ( वय ३५) या पाच दिवस बेपत्ता महिलेचा मृतदेह गारगोटी नदिकच्या पुलाजवळ बुधवार दि.३१ जूलै २०२४ दिसून आला.ही बातमी मिळताच शेणगांवचा जीगरबाज युवक योगेश कोळी याने तडक घटनास्थळ गाठले आणि परिस्थीतीचे गांभिर्य ओळखून महापुरात लगोलग आहे त्या परिस्थीतीत महापुराच्या विशाल पाण्यात आपली स्वत:ची बोट घेवून शोध मोहिम सुरू केली. पाण्याचा धडकी भरवणारा विशाल प्रवाह, जोराचा पाऊस आणि वारा अशा प्रतिकूल परिस्थीतीत जीवावर उदार होवून महापुरात झोकून देणे हे येरागबाळ्याचे काम नाही. शेणगांवच्या नदिकाठाला राहून महापुरात कसे पोहायचे आणि परत काठावर यायचे याचे बाळकडू मिळालेला हा कोळी समाजाचा तरूण आपल्या अनुभवाच्या आधारावर प्रयत्नांची पराकाष्ठा करत शोधाशोध करत होता. विजेच्या तारांची भिती जास्त होती. पाण्यात बुडलेला ऊस आणि नदिकाठचा झाड झाडोरा यात नाव एखादेवेळेस अडकली तर?मनात भिती होती पण सराव असल्याने भिती निघून गेलोली.दोन तास झाले तरी शोध संपेना.
तीन किलोमिटरचा प्रवास होवून गेला तरी प्रेत सापडेना. म्हसवे गाव च्या दिशेने वाटचाल सुरू केली. नदीच्या नागमोडी वळणात अखेर महालवाडीच्याच घाटाजवळ जांभळीच्या झाडोऱ्यात एक मानवी आकृती दिसली आणि मोहिम फत्ते झाल्याची जाणीव झाली. विवस्त्र अवस्थेत असलेले प्रेत पाहाण्यासारखे नव्हते. कडगाव गावात पडलेली महिला वाहत येवून पाचव्या दिवशी गारगोटी पुलावरून एकाला दिसली.आणि अडिच तासाच्या थरारनाट्यानंतर अखेर महापुरात सापडली.हा साराशोध प्रवास जीवघेणा होता.
या साऱ्या प्रवासात योगेश ने एका तरूणाचे सहाय्य घेतले.पाण्यात उतरले की बोट चालवणारा कोणीतरी सोबत हवा होता.ती सोबत शशिकांत पाटील या तिरवडेच्या युवकाने केली. हे प्रेत काठावर आणून संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिले.नातेवाईकांनी योगेश कोळी यांचे मनोमन आभार मानले आणि बक्षिसपत्र म्हणून काही रक्कम देताना त्याने ती नाकारले. एवढा पराक्रम करूनही मोबदला त्याने स्विकारला नाही, ही उदारता आदर्शवादी आहे.
या प्रसंगाबध्दल अधिक माहिती देताना जिगरबाज युवक योगेश कोळी म्हणाले की, लहानपणापासूनच पाण्यात पोहोण्याचा मला छंद आहे. वेदगंगेच्या नदिकाठी राहिल्याने महापुराच्या पाण्याबध्दल सतत ऊत्सुकता लागून राहिलली असते. अशा या महापुरात मी दरवर्षी पडून काही ना काही मानवी कर्तव्य बजावत असतो.पण हे करत असतांना मला अपूऱ्या साधनामूळे अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मी दरवेळी जीव धोक्यात घालून हे जे कर्तव्य बजावत असतो त्या साठी मला एका चांगल्या नावेची गरज आहे.महापुरात मग मी अजून काही पूढे जावून मानवतेचे सहाय्य करू शकतो. समाजातील संस्था, काही घटक अथवा शासनाने अशी साधने मला मिळवून द्यावीत या प्रतिक्षेत मी आहे. यावेळी योगेश याने सन 2019 व 2021 च्या महापुरात अडकलेल्या केलेल्या अशा मदतीची आठवण करून दिली.