मोटरसायकल अपघातात गरोदर महिला जागीच ठार

कोगनोळी :
कागल येथील आरटीओ चेक पोस्टसमोर झालेल्या मोटरसायकल अपघातात सुशीला रवींद्र खोत (वय 28, रा. हणबरवाडी-कोगनोळी ता. निपाणी) या जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. सुशीला या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या.
त्या वैद्यकीय तपासणीसाठी पती रवींद्र बाळासो खोत (वय 32) व मुलगा विराज (वय २) यांच्यासोबत मोटरसायकल वरून कागल येथील खाजगी रुग्णालयाकडे निघाल्या होत्या. मोटरसायकल कागल येथील आरटीओ चेक पोस्ट समोर आली असता मालवाहतूक कंटेनरला ओव्हरटेक करताना पाठीमागून येणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली.
या अपघातामुळे सुशीला या मोटारसायकल वरून खाली पडल्या व कंटेनरच्या चाकाखाली सापडल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती रवींद्र व मुलगा विराज हे गंभीर जखमी झाले. जखमींना कागल येथील सिटी प्राईड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कागल येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सुशीला यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू-सासरे असा परिवार आहे.
अपघातामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.