ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : राज्‍यात आठ दिवसांत २३ कोटींची रोकड जप्त ; आचारसंहिता लागू झाल्‍यानंतर निवडणूक आयोगाची कारवाई

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात २३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, तर १७ लाख लिटर दारु जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली. आचारसंहितेच्या काळात परवानाधारकांची शस्त्रे ताब्यात घेण्यात येतात, मात्र आता पर्यंत ३३ हजारांहून अधिक परवानाधारकांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वर, बंदुका सरकारकडे जमा केलेल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या १९ एप्रिल २०२४ रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना चोक्कलिंगम् यांनी संबंधित माहिती दिली. निवडणूक होऊ घातलेल्या रामटेकमध्ये एक, नागपूरमध्ये पाच, भंडारा-गोंदियामध्ये दोन तर गडचिरोली-चिमूरमध्ये दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चंद्रपूरमध्ये आतापर्यंत एकही अर्ज दाखल झालेल नाही,
असे त्यांनी सांगितले.

राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जप्त करण्यात आलेल्या बेहिशेबी २३ कोटी रुपयांपैकी सर्वाधिक म्हणजे ३ कोटी ५० लाख रुपयांची रोकड मुंबईच्या उपनगरातून जप्त करण्यात आली आहे. याशिवाय ४३ किलो सोने, चांदी आणि इतर मौल्यवान ऐवजही जप्त करण्यात आला आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सी.आर.पी.सी. प्रमाणे १३ हजार १४१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

आतापर्यंत परवाना नसलेली ३०८ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आचारसंहितेच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर परवानाधारकांना शस्त्रे सरकार दरबारी जमा करावी लागतात.राज्यात एकूण ७७ हजार १४८ शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. त्यापैकी ४५ हजार ७५५ शस्त्र ताब्यात घेण्यात आली आहेत. तर काही जणांना अपवादात्मक परिस्थितीत शस्त्र वापरण्यास मुभा दिली आहे. मात्र परवानाधारकांपैकी आतापर्यंत ३१ हजार ३९३ शस्त्रे सरकारकडे जमा केलेली नाहीत. ही शस्त्रे जमा करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे,
असेही त्‍यांनी सांगितले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks