नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार ; विरोधकांच्या बालेकिल्ल्यात घेणार पहिली सभा

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. इंडिया आघाडी विरुद्ध भा.ज.पा. असे चित्र देशात असताना, पंतप्रधान थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बालेकिल्ल्यातच प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.शनिवारी, १६ मार्च २०२४ ला कलबुर्गी येथे जाहीर सभेला संबोधित करून कर्नाटकमधून भारतीय जनता पक्षाच्या (भा.ज.पा.) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व्ही. सुनील कुमार यांनी ही माहिती दिली.
कलबुर्गी हा जिल्हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एम. मल्लिकार्जुन खर्गे यांचा बालेकिल्ला मानला जातो.सन २००९ आणि २०१४ मध्ये ते येथूनच लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते ;परंतु, गेल्या वेळी भा.ज.पा.च्या उमेश जाधव यांच्याकडून पराभूत झाले होते.काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष यावेळी ८१ वर्षीय खर्गे यांचे जावई राधाकृष्णन दोड्डामणी यांना येथून उमेदवारी देऊ शकतो.
सुनील कुमार यांनी भा.ज.पा.च्या राज्य मुख्यालयात पत्रकारांना सांगितले की,पंतप्रधान मोदी १६ मार्च २०२४ ला कलबुर्गी येथील एन.व्ही. स्पोर्ट्स ग्राउंडवर जाहीर सभा घेणार आहेत, तर १८ मार्च २०२४ ला शिवमोग्गा येथील अल्लामप्रभू मैदानावर जाहीर सभेला संबोधित करतील. कर्नाटक हे भा.ज.पा.साठी सर्वात महत्त्वाचे राज्य आहे, कारण दक्षिणेतील ते एकमेव राज्य आहे जिथे त्यांनी यापूर्वी स्वबळावर राज्य केले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील २८ पैकी २५ जागा भा.ज.पा.ने जिंकल्या होत्या, तर एक जागा पक्षाने पाठिंबा दिलेल्या अपक्षांना गेली होती. मा.क.प.च्या उमेदवारामुळे काँग्रेसला धक्कागुवाहाटी : आमदार मनोरंजन तालुकदार हे आसाममधील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ही घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसने या मतदार संघातून आधीच उमेदवार जाहीर केला आहे. मा.क.प.चे प्रदेश सचिव सुप्रकाश तालुकदार यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षाने बारपेटा मतदारसंघातून अनुभवी नेते आणि आमदार तालुकदार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.‘लोकांच्या व्यापक हितासाठी आम्ही काँग्रेसला बारपेटामधून उमेदवार मागे घेण्याचे आवाहन करतो,’ असेही ते म्हणाले.