साखर उद्योगातील “आदर्श संस्था” म्हणून शाहूचा नामोल्लेख हे आमच्यासाठी अभिमानास्पद : राजे समरजितसिंह घाटगे ; शाहूच्या पोटॅश खत व सल्फरलेस साखर या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांचा शुभारंभ

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
साखर निर्मितीबरोबर पूरक व्यवसायाची जोड असल्याशिवाय साखर कारखाने आर्थिक सक्षम होणार नाहीत. हे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी वीस वर्षापूर्वी बोलून दाखवले होते.म्हणूनच त्यांनी “शाहू” मध्ये नवनवीन उपपदार्थांची निर्मिती करण्यास व आधुनिक तंत्रज्ञान आणण्यास प्राधान्य दिले.आजही शाहूची व्यवस्थापकीय व प्रशासकीय वाटचाल त्यांच्याच विचाराने सुरू असल्याने साखर उद्योगातील ” आदर्श संस्था, ” म्हणून शाहूचा होणारा नामोल्लेख हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
शाहू साखर कारखान्यामार्फत उत्पादित ‘शाहू पोटॅश खत’ व ‘सल्फरलेस साखर’ या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांचा शुभारंभ कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी आयोजित,शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले,स्व.राजेसाहेब नेहमी दूरदर्शी विचाराने कारखान्याचा कारभार करीत असत. त्यांनी नियोजित केलेले उपक्रम आज आम्ही राबवून त्यांचे उद्घाटन करीत आहोत. नफ्यातील पैसे अशा प्रकल्पांसाठी बाजूला काढून ठेवण्याचे धोरण त्यांनी यशस्वीपणे राबवले.त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत असताना शाहू साखर कारखाना, इतिहासातील 170 कोटी रुपयांचे सर्वात मोठे विस्तारीकरण यशस्वीपणे पूर्ण करीत आहे. साखर कारखानदारीतील अद्यावत तंत्रज्ञान या प्रकल्पामध्ये वापरले आहे.अश्याच प्रकारे भविष्यात शाहू कारखाना व शाहू समूह वाढवत जाऊया असेही ते म्हणाले.
श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या,आज शाहू साखर कारखान्याचा विस्तीर्ण परिसर पाहताना जुन्या आठवणी जाग्या झाल्याशिवाय राहत नाहीत. त्याकाळी साखर कारखाना प्रतिदिनी 1250 मे टनाने सुरू झाला होता. आज विविध उपपदार्थ प्रकल्पाची पाहणी करताना फार मोठा उद्योग समूहच उभा राहिल्याचे समाधान वाटते. पूर्वी पोती पूजन म्हटले की फक्त साखर पोती पूजन डोळ्यासमोर यायचे. आता उपपदार्थ निर्मितीतून तयार केलेल्या पोटॅश खताच्या पूजन करण्याचा मान मिळत आहे. स्व. राजेंची दूरदृष्टी व त्यांना सर्वांनी केलेली साथ यामुळे शाहू कारखाना व शेतकऱ्यांची प्रगती झाली आहे. यामलेच शाहूचा सर्वत्र मानसन्मान होऊन गौरव होत आहे, समरर्जीतराजे छत्रपती शाहू महाराज व स्व. राजेसाहेब यांचे आचार विचार आपल्या कृतीतून पुढे नेत आहेत त्यांना साथ द्या.
यावेळी प्रकल्पाची यंत्रसामग्री पुरवठा करणारे कंपनीचे प्रतिनिधी व सिव्हील कॉन्ट्रॅक्टर यांच्या प्रतिनिधींचा तसेच महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासद केरबा माने(कौलगे) यांचाही सत्कार करणेत आला.
प्रास्ताविकात कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, शाहू साखर कारखान्याने पोटॅश खत व सल्फरलेस साखर हे दोन्ही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पर्यावरणपूरक पद्धतीने उभे केले आहेत. दोन्ही उत्पादनांना बाजारात चांगली मागणी आहे. केंद्रशासन आता मोठ्या प्रमाणात पोटॕश खताची आयात करते. स्थानिक पातळीवर पोटॅश निर्मिती केल्यामुळे परकीय चलनात बचत होणार आहे.शिवाय शाहू पोटॅश खत हे वाजवी दरात शेतकऱ्यांना पुरविण्यात येणार आहे, वाढीव सह वीजनिर्मिती प्रकल्प आणि इथेनॉल प्रकल्प यांची उभारणी अंतिम टप्प्यात आली असून हे दोन्ही प्रकल्प या हंगामातच सुरू होतील.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,ज्येष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील सर्व संचालक, संचालिका यांच्यासह शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद शेतकरी उपस्थित होते. आभार संचालक युवराज पाटील यांनी मानले.
मार्चमध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्रतिटन रू ३४०० रुपये दर मिळणार…
पूर्वी गळीत हंगाम एप्रिल –
मे पर्यंत चालावयाचे. त्यामुळे या महिन्यापर्यंत येणाऱ्या सभासदांचे उसाचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी स्व. राजेसाहेब यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा उशिरा ऊस गाळप अनुदान योजना कारखान्यात आणली. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन ही योजना आपण यावर्षी 15 जानेवारी 24 पासून पुन्हा आणली
त्यामुळे 15 जानेवारी ते 31 जानेवारी अखेर गळीतासाठी आलेल्या उसास प्रतिटन रू 3250/- एक फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी प्रतिटन रू 3300/-
16 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी अखेरील ऊसास प्रतिटन रू 3350/- व मार्च महिन्यात गळीतासाठी येणाऱ्या उसास प्रति टन 3400/- ऊस दर मिळणार आहे