ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लहानपणीच आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या कुंभारवाडी येथील युवकाची प्रेरणादायी कहाणी , खाकी वर्दीचे स्वप्न साकार!

कळे -वार्ताहर अनिल सुतार

त्याच्या लहान वयातच डोक्यावरील आई-वडीलांचे छत्र हरपले.त्यातच घरी अठरा विश्व दारिद्र्य पाचवीला पूजलेले.शिक्षणाची आस मनात असूनही कसेबसे बारावी पर्यंतच शिक्षण केले. त्यात वृध्द आजी-आजोबांची जबाबदारी सांभाळत, बांधकाम गवंड्याच्या हाताखाली ते गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत काम करत उदरनिर्वाह सुरु होता.या सर्व परिस्थितीचे भान ठेवत जिद्द व चिकाटीच्या जोरावर खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगत कसून सराव केला.काही वेळा अपयश ही आले.मात्र त्याने अपयशावर ही मात केली.व अखेर राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली पैकी कुंभारवाडी येथील रवींद्र बळवंत सुतार याचे खाकी वर्दीचे स्वप्न साकार झाले.त्याची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाणीटंचाईने ग्रासलेल्या दुर्गम अशा धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली पैकी कुंभारवाडी गावची लोकसंख्या सुमारे चारशे असून गावात सुतार,कुंभार, जंगम,नाभिक समाजाचे लोक गुण्यागोविंदा एकत्र राहतात.येथील अनेक युवक शेतीसह पारंपारिक कामधंदा करत शिक्षण घेत आहेत.त्याच पैकी एक म्हणजे रवींद्र सुतार होय.लहानपणीच आई-वडीलांचे छत्र हरपले.आणि वृद्ध आजी आजोबांसह घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर पडली.त्यातच आजोबांना अर्धांगवायुने घेरले अन् रवीवर अस्मानी संकटच कोसळले.

कसेबसे बारावी पर्यत शिक्षण घेत रवींद्रने गावातील इतर तरुणांच्या बरोबर बांधकामावर तर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्यात काम केले.असा दिनक्रम सुरु असतानाच रवींद्र याला खाकी वर्दी खुणावू लागली.आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत दाखल झाला.व तो दररोज पहाटेच्या वेळी लवकर उठून भरतीचा सराव करू लागला.पोलीस दल भरतीसाठी त्याने अनेक वेळा प्रयत्न केले. पण काही गुणांनी त्याला अपयश येत होते. पण अपयश येऊन देखील, रवींद्रने न खचता आपले प्रयत्न चालूच ठेवले होते.

सध्या त्याची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून नुकतीच पोलीस प्रशिक्षणासाठी रवानगी झाली आहे.रवींद्रच्या यशाने कुंभारवाडी ग्रामस्थ व मित्र परिवारातून आनंद व्यक्त होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मेहनत,जिद्दीच्या जोरावर संधीच सोन करा..!
आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीला न डगमगता रवींद्र याने जीवनात कठीण संघर्ष करत यशापर्यंत केलेला प्रवास पोलीस दलात येऊ इच्छिणाऱ्या युवक युवतींसाठी प्रेरणादायी आहे.अपयशाने खचून न जाता सातत्य व योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर खाकी वर्दीचे स्वप्न साकार करू शकलो. तरी तरुणांनी मेहनत व जिद्दीच्या जोरावर संधीचं सोनं करायला शिकलं पाहिजे.
– रवींद्र सुतार,मुंबई पोलिस

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks