एक व्हॅलेन्टाईन असाही ……! वृक्षारोपण करुन परीट दांम्पत्याने साजरा केला अनोखा व्हॅलेन्टाईन डे

(बिद्री प्रतिनिधी /अक्षय घोडके) :
१४ फेब्रुवारी हा जगभरातील प्रेमिकांचा खास दिवस. या दिवशी अनेकजण आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देऊन हा दिवस अविस्मरणीय करतात. परंतू बोरवडे ( ता. कागल ) येथील निखील व ऋतुजा परीट या दांम्पत्याने या दिवशी वृक्षारोपण करुन अनोख्या पद्धतीने आजचा व्हॅलेन्टाईन डे साजरा केला. या कृतीतून त्यांनी इतरांना पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश दिला असून त्यांच्या या आदर्शवत उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
निखील हा पर्यावरणप्रेमी असून त्यांने आजअखेर वेगवेगळ्या निमित्ताने वृक्ष लागवड करुन या चळवळीला बळ दिले आहे. मयत व्यक्तीच्या स्मृती जतन करण्यासाठी त्या घरातील लोकांना निखिलने मोफत रोपे भेट दिली. तर बिद्री महाविद्यालयाच्या खडकाळ माळावरही त्याने प्रयत्नांतून सुंदर बाग फुलवली आहे. स्वतःच्या व इतरांच्या वाढदिवसाला वृक्षलागवड व वृक्षभेटीचा अनोखा उपक्रम निखिलने राबविला आहे. याशिवाय संकटकाळात प्राणी व पक्षी यांनाही मदत करत प्राणीप्रेम जपले आहे.

आजच्या व्हॅलेन्टाईन डे दिवशी निखिलने पत्नीला सोबत घेत गाव तलावाच्या काठावर नवीन रोप लावले. निखील व त्याची पत्नी ऋतुजा यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस येत्या २३ फेब्रुवारी रोजी असून यापुढेही आणखी वृक्षारोपण करण्याचा आणि हे वृक्ष जगविण्याचा मानस असल्याचे या दांम्पत्याने यावेळी सांगितले.