एल.पी.जी.(L.P.G.) सिलिंडर पुन्हा महागला , जाणून घ्या किती रुपयांनी वाढली किंमत

देशभरातील तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एल.पी.जी. गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात.आजही गॅस सिलिंडरचा नवीन दर अपडेट करण्यात आला असून १ फेब्रुवारी २०२४ च्या पहाटे एल.पी.जी. ग्राहकांना मोठा धक्का बसला.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशीच तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे बजेट बिघडवले आणि व्यावसायिक एल.पी.जी. सिलिंडरच्या किमतीत १४ रुपयांनी वाढ केली. तर घरगुती एल.पी.जी. गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवीन दर आजपासून लागू झाल्या असून गेल्या महिन्यातही तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरचा भाव १.५० रुपयांनी वाढवला होता.
चारही महानगरांमध्ये L.P.G. सिलिंडरच्या किंमती काय फेब्रुवारी महिना सुरू होताच तेल आणि गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली आहे. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर वाढीनंतर १,७६९.५० रुपयांवर पोहोचला तर मुंबई १,७२३.५० रुपये, कोलकातामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १,८८७ रुपयांवर पोहोचली आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस १,९३७ रुपयांना उपलब्ध आहे.
घरगुती गॅसच्या किमती ‘जैसे थे’व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरामध्ये सातत्याने बदल होत असताना घरात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचा भाव’जैसे थे’ ठेवण्यात आला आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून व्यावसायिक गॅसच्या दरात चढउतार होत आहेत पण घरगुती एल.पी.जी. गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल झालेला नाही. घरगुती गॅसच्या किमतीत शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आला होता.
तेव्हापासून व्यावसायिक गॅसच्या किमती जवळजवळ प्रत्येक महिन्याला बदलल्या, परंतु घरगुती गॅसच्या किमती स्थिर आहेत. गेल्या वर्षी १ मार्च २०२३ रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १,१०३ रुपये होती ज्यात ऑगस्टमध्ये २०० रुपयांची कपात करण्यात अली आणि तेव्हापासून घरगुती गॅस सिलिंडर फक्त ९०३ रुपयांना मिळत आहे.थंडीच्या हंगामात मागणीत वाढ नोंदवली गेली तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींवरही परिणाम झाला,ज्यामुळे व्यावसायिक सिलिंडर पुन्हा एकदा महागला आहे.