कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीवघेणी वडाप वाहतूक जोमात ; रस्ता सुरक्षा अभियानाला कळे पोलिसांचा “ठेंगा”

कळे -वार्ताहर अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व प्रवाशांसाठी जीवघेणी वडाप वाहतूक जोमात सुरू असून येथील वरीष्ठ पोलिस अधिकारी व वाहतूक नियंत्रण शाखेकडून ” हप्ता ” वसुलीमुळे अशा जीवघेण्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या पाठीवर येथील पोलिस यंत्रणेचा हात असल्याने परिसरातील जाणकारांतून पोलीस ठाण्याच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.
संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचा भंग करु नये , नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्यात येईल म्हणून वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी प्रबोधन म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेकडून ३४ वे रस्ता सुरक्षा अभियान १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान राबविले जात आहे असे असतानाही कळे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांचा व येथील वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्यांचा कारभार मात्र याउलट दिसून येत असून या पोलीस ठाण्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियानाला ठेंगा दाखवण्यात आला आहे.
येथील कळे व बाजारभोगाव परिसरातील ग्रामीण भागात धोकादायक अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला असून या भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. काही ठिकाणी तर वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंध इतके मधूर आहेत की, जणूकाही वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहतूकदारांना कोणताही धोका कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळे एकेका रिक्षा, टॅक्सी, टेंम्पोत प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक तर थेट टॅक्सी,रिक्षा, टेंम्पोत मागे लटकून किंवा वर टपावर बसवून प्रवाशांची वाहतूक होताना दिसते. अशा प्रकारच्या वाहनांना कधी एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते.
बाजारभोगाव,कळे, काटेभोगाव या ग्रामीण भागातील व परिसरातील कोणत्याही गावाचे नाव घ्या, अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठलेला दिसून येईल. वाहनांमध्ये प्रवासी अक्षरश: कोंबून भरलेले असतात. एकेका रिक्षात दहापेक्षा अधिक तर, टॅक्सी किंवा अॅपेरिक्षात हीच संख्या १५ ते २० दरम्यान गेलेली दिसून येईल. परिसरातील आठवडी बाजार किंवा लग्नसराईत तर खासगी प्रवासी वाहतूकदारांची रेलचेल असते. वाहनाच्या मागे, टपावर तसेच पुढील भागावरही प्रवासी बसविलेले असतात. ही धोकादायक वाहतूक कळे पोलिसांच्या देखत होत असतानाही त्यांच्याविरूध्द कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.
वाहतूक पोलिसांना ठराविक ‘हप्ता’ दिल्यावर कारवाईपासून मुक्तता होत असल्याची चर्चा आहे. हप्ता थकल्यावर मात्र पोलिसांकडून कारवाई होते. बऱ्याच वेळा वडाप वाल्यांची तपासणी होणार असल्याचे चालकांना आधीच कळलेले असते. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एखाद्या वाहनास अपघात झाल्यावर या विषयाचा गवगवा होत असल्याने वाहतूक पोलिसांना काही दिवस कारवाईचा ‘फार्स’ करणे भाग पडते. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे ग्रामीण भागात तपासणी मोहीम सुरू केल्यास अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीस आळा बसू शकेल.तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाचे मुख्य पोलीस अधिकारी, कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लक्ष घालून कळे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांसह संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज जाणकारांतुन व्यक्त होत आहे .