ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

श्री अंबाबाई मंदिर हे चिरंतन टिकणारे मंदिर आहे. मंदिर परिसराचा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देवून कोल्हापूर शहर आणि येणाऱ्या कोट्यवधी नागरिकांचा विचार करुन प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या विकास आराखड्याबाबत व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याच्या अनुषंगाने मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांसोबत आज पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराबाई सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे, अभियंता सुयश पाटील तसेच जयंत पाटील, आदिल फरास, आर्किटेक्ट सुनील पाटील तसेच मंदिर परिसरातील रहिवासी, व्यापारी, उद्योजक, भाडेकरु उपस्थित होते.

कोल्हापूर शहराच्या विकासासाठी श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास होणे आवश्यक असून प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या विकास आराखड्याला विरोध नसून सहकार्य केले जाईल, असा विश्वास यावेळी मंदिर परिसरातील रहिवासी व व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देशभरातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येत आहे. श्री अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापुरात येणारे पर्यटक व भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा देणे आवश्यक आहे. या सुविधा देताना काही घटकांची गैरसोय होऊ शकते. तथापि शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करताना शहरातील नागरिक व मंदिर परिसरातील रहिवासी, व्यापारी, उद्योजकांना त्रास होणार नाही याचा विचार करण्यात आला आहे. श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा बनवताना मंदिर परिसरातील नियमित पार्किंग, नवरात्र काळातील दर्शन रांग व पार्किंग व्यवस्था तसेच भाविकांच्या सोयी सुविधांचा विचार करण्यात आला आहे.

अयोध्या येथील श्री राम मंदिर परिसर ज्याप्रमाणे प्रशस्त व खुला ठेवण्यात आला आहे, त्याप्रमाणे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसराचा विकास करण्यात येईल. हा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिली.
सुनील पाटील यांनी मंदिर परिसर विकास आराखड्याचे सादरीकरण केले.

श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करताना या भागातील रहिवासी व व्यापाऱ्यांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा करुन जवळपास उपलब्ध होतील अशा जागांचा वापर पुनर्वसनासाठी करण्यात यावा, याठिकाणचे रहिवासी व व्यापाऱ्यांचे याच परिसरात विस्थापन करावे, आदी सूचना उपस्थित रहिवासी व व्यापाऱ्यांनी आराखड्याबाबत केल्या.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks