आरबीआय, सेबी मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 41 लाखांची फसवणूक

रिझर्व बँक ऑफ इंडिया किंवा सेबी मध्ये कायमस्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 40 लाख 82 हजार 551 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी नवी दिल्ली येथील व्यक्तीवर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत डीएसके विश्व रोड, धायरी येथे घडला आहे.
याबाबत राजेश नारायणराव ढमढेरे (वय-55 रा. स्काय आय स्टार सिटी, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून गौरव दिग्विजयनाथ पांडे (रा. न्यु फ्रेन्डस कॉलनी, नवी दिल्ली) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव पांडे याने फिर्यादी राजेश यांना इनकम टॅक्स येथे कमीशनर पदावर असल्याचे खोटे सांगून विश्वास संपादन केला. पांडे याने फिर्यादी यांच्या मोठ्या मुलीला दिल्ली येथील रिझर्व बँक ऑफ इंडिया किंवा सेबी मध्ये कायमस्वरुपी नोकरी लावतो असे आश्वासन दिले. नोकरी लावण्यासाठी त्याने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 40 लाख 82 हजार 551 रुपये घेतले.
आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीच्या नावाने खोटे नियुक्तीपत्र तयार करुन दिले. त्यामुळे फिर्यादी यांच्या मुलीने ती करत असलेली नोकरी सोडली. मात्र, नियुक्तीपत्र खोटे असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली. परंतु त्याने राजेश ढमढेरे यांची दिशाभूल करुन आजपर्यंत मुलीला नोकरी लावली नाही. तसेच घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. राजेश ढमढेरे यांनी याबाबत सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन आरोपी गौरव पांडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.