कोल्हापुर : कसबा बावडा पोलीस पेट्रोल पंपावर पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण प्रकरणी चौघांना अटक

कसबा बावडा रोडवर पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी आलेल्या चौघानी पोलीस कॉन्स्टेबल व त्याच्या सहकार्यास बेदम मारहाण केली. पेट्रोल टाकल्यानंतर पैसे देण्याच्या कारणावरून हा वाद झाला होता.याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघांना पोलिसांनी अटक केली.
सोमवारी मध्यरात्री चौघे तरुण आपल्या कारमधून कसबा बावडा येथील पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी आले होते, यावेळी ऑनलाईन पैसे देण्याच्या कारणावरून त्या चौघा तरुणांनी पेट्रोल टाकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला. यावेळी कारमधून उतरून चौघांनी पोलीस कॉन्स्टेबल अल्ताफ कुरेशी व त्याचा सहकारी किरण आवळे या दोघांना मारहाण केली.आणि दगडफेक करून तेथून पलायन केले.
याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास करून संशयित परशुराम बिरंजे (वय 24 रा. कलानगर), बालाजी गोविंद देऊळकर (वय 23 रा .पाचगाव), सुरज उपेंद्र शिरोलीकर ( वय 22 रा. विचारमाळ ), पृथ्वीराज संदीप शिंदे (वय 19 रा. सदर बाजार) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे सहकारी अद्याप बेपत्ता आहेत .पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आले आहे.