ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा उद्या (दि.१८) रोजी दीक्षांत समारंभ

शिवाजी विद्यापीठाचा 60 वा हीरकमहोत्सवी दीक्षांत समारंभ सोमवारी (दि. 18) सकाळी 11.30 वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुुउद्देशीय सभागृहात होणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा प्रमुख पाहुणे असणार आहेत. राज्यपाल रमेश बैस अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. दीक्षांत समारंभात 49 हजार 438 पदव्या प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दीक्षांत समारंभात 9 हजार 605 विद्यार्थी उपस्थित राहून पदवी घेणार आहेत. 39 हजार 833 विद्यार्थ्यांना पोस्टाने पदवी प्रमाणपत्र पाठवली जाणार आहेत. यावर्षी पदवी घेणार्‍या विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे. विद्यार्थ्यांच्या तुलनेत पदवी घेणार्‍या विद्यार्थिनींची टक्केवारी 55.78 इतकी आहे. समारंभात 46 पीएच.डी. स्नातकांसह 16 जणांना व्यासपीठावर पारितोषिके व पदवी प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहे.

साईसीमरन यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक; बिल्कीस गवंडी यांना कुलपती सुवर्णपदक शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. (मास.कॉम.) अधिविभागाची विद्यार्थिनी साईसीमरन हिदायत घाशी (मूळ गाव बत्तीस शिराळा, जि. सांगली) हिला 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक, तर जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरची विद्यार्थिनी बिल्कीस हिदायत गवंडी (मु. पो. आगर, ता. शिरोळ) हिला कुलपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे. दीक्षांत समारंभात त्यांना ही पदके प्रदान करण्यात येतील.

कुलगुरूंच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी

दीक्षांत समारंभानिमित्त सलग 17 व्या वर्षी ग्रंथ महोत्सवाचे 16 ते 18 डिसेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने नामवंत कंपनीचे प्रकाशक, पुस्तक विक्रेते, डेटाबेस पॅकेज, डिजिटल ग्रंथ, उपाहारगृह आदींचे 40 स्टॉल्स असणार आहेत.

शनिवारी (दि. 16) सकाळी 7.30 ते 9.30 ग्रंथदिंडीला पालखी मिरवणुकीने (कमला कॉलेज) सुरुवात होईल. सकाळी 7.30 वाजता कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 10 वाजता ग्रंथमहोत्सव स्टॉल उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते राजमाता जिजाऊसाहेब सभागृहजवळ होईल. दि. 17 रोजी सकाळी 11 स्वररंग हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks