सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एफआरपी ३,२५० रुपये : कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना चालू गळित हंगामासाठी उसाला टनाला रू. ३,२५० प्रमाणे एफ. आर. पी. देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे, आत्तापर्यंत कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या उसाला कारखान्याने टनाला रू. ३,१५० प्रमाणे एफ. आर. पी. अदा केली आहे. दरम्यान; या गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपासाठी आत्तापर्यंत आलेल्या व यापुढे येणाऱ्या सर्वच उसाला टनाला ३,२५० रुपयेप्रमाणे एफ. आर. पी. दिली जाणार आहे.
लवकरच विस्तारित इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन…….!
श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे, कारखान्याचा २०१५ साली उभारलेला दररोज ३० हजार लिटर्स क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित होता. २०१८ मध्ये प्रतिदिन ५० हजार लिटर्स अशी क्षमतावाढ केली. आता कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दररोज एक लाख लिटर्स निर्मिती क्षमतेच्या या प्रकल्पात सिरपपासून दररोज एक लाख लिटर उत्पादन सुरू आहे. ३० टन क्षमतेच्या बॉयलरसह ३.२ मेगावॅट टर्बाइन, असे हे विस्तारीकरण झाले आहे. सन २०२३-२४ या हंगामात ऑइल कंपन्यांकडून ८० लाख लिटर्स सिरप व ६० लाख लिटर्स बी हेवीपासून, असे एकूण एक कोटी, ४० लाख लिटर्स इथेनॉल पुरवठा करण्याचे करार झाले आहेत. त्यापैकी; आजअखेर सिरपपासून अकरा लाख लिटर्स इथेनॉल निर्मिती झाली आहे. चार लाख लिटर इथेनॉलची निर्यात पूर्ण झाली आहे.