करवीर : इस्पूर्लीत घराची भिंत अंगावर कोसळल्याने झोपलेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू

करवीर तालुक्यातील इस्पूर्लीत येथे रात्री घराची भिंत अंगावर कोसळल्याने झोपलेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. रणवीर रमेश माळी (वय १३, मूळगाव निपाणी) असे त्याचे नाव आहे. त्याचे वडील रमेश माळी (४८) व आई रेखा (४२) दोघेही गंभीर जखमी आहेत.
इस्पूर्लीत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी : रमेश माळी कुटुंबासहित इस्पूर्ली येथे सात वर्षांपूर्वी मोलमजुरी करण्यासाठी आले होते. नागाव मार्गावरील दूधगंगा शाळेसमोरील घरात ते भाडेतत्त्वावर राहत होते. माळी कुटुंब मंगळवारी रात्री घरात झोपले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास घराची भिंत कोसळली व मोठा आवाज झाला. त्याने शेजारील नागरिक बाहेर आले. त्यांना भिंत कोसळण्याचे निदर्शनास आले.
माळी यांच्या घराच्या दिशेने आरडाओरडा ऐकू येत होता. माळी यांच्या घरातील सर्वजण दगड, विटाच्या ढिगाऱ्याखाली सापडले होते. दरम्यान, लोकांनी ढिगाऱ्याखाली सापडलेल्या माळी कुटुंबाला बाहेर काढून सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान रणवीर याचा मृत्यू झाला. माळी यांचा गॅस-स्टोव्ह रिपेरी करण्याचा व्यवसाय आहे. घराची भिंत कोसळल्याने त्यांच्या प्रापंचिक साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.